आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:03 PM2024-10-25T17:03:01+5:302024-10-25T17:17:55+5:30

Aditya Thackeray, Uddhav Thackeray Property, Income: आदित्य ठाकरेंची कमाई काही कोटींत, उद्धव ठाकरेंची काही लाखात... पहा किती...

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. आदित्य ठाकरेंना मनसेच्या संदीप देशपांडेंचे आव्हान आहे. तसेच शिंदे गट राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अशातच आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे.

आदित्य ठाकरेंनी त्यांच्याकडे सोन्याचे कडे, रत्नजडीत हार, सोन्याची बिस्किटे आदी ऐवज असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्याकडे एकूण २३.४३ कोटींची संपत्ती आहे. २०१९ मध्ये त्यांनी एकूण संपत्ती १७.६९ कोटी रुपये जाहीर केली होती. म्हणजेच पाच वर्षांत आदित्य यांच्या संपत्तीत ५.७४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

२०१९-२० मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न १.०७ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये १.७१ कोटी, २०२१-२२ मध्ये घटून ८८.९६ लाख रुपये झाले होते. २०२२ मध्ये वाढून १.११ कोटी आणि २०२३-२४ मध्ये १.२७ कोटींचे उत्पन्न आदित्य यांनी जाहीर केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या संपत्तीचा सहवारस असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंचे उत्पन्न कोटीत आणि उद्धव ठाकरेंचे काही लाखात असल्याचे दिसत आहे. २०१९-२० मध्ये उद्धव ठाकरेंची कमाई केवळ २.१९ लाख रुपये होती. २०२०-२१ ती घटून १.९४ लाख रुपये, २०२१-२२ मध्ये १.६८ लाख, २०२२-२३ मध्ये वाढून १.७५ लाख आणि २०२३-२४ मध्ये ती आणखी वाढून २.२९ लाख रुपये झाली.

आदित्य ठाकरेंकडे 37,344 रुपये रोख आहेत. तर 39,024 रुपयांची रोख ही वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. आदित्य ठाकरेंची १० बँकांत खाती आहेत. यात मिळून २.८१ कोटी रुपये जमा आहेत. तसेच कौटुंबिक खात्यात १५.९७ लाख रुपये जमा आहेत. विविध कंपन्यांमध्ये १०.१४ कोटींची गुंतवणूक आहे. २१.५५ लाख रुपयांचा विमा आहे.

आदित्य ठाकरेंकडे एकच कार आहे, तिची किंमत ४.२१ लाख रुपये असून ही बीएमडब्ल्यू कार २०१३ ची आहे.

आदित्य ठाकरेंकडे १.९१ कोटींचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने आहेत. सोने आणि हिऱ्याने लगडलेले एक कडे आहे. याची किंमत ३.९० लाख रुपये आहे. या कड्यावर ५३५ हिरे लागलेले आहेत. तसेच ४७ लाखांचे दोन कडे आहेत. एवढेच नाही तर १ किलो ४६६ ग्रॅमचे सोन्याचे शिक्के आणि बिस्किटे आहेत. याची किंमत १.९ कोटी रुपये आहे.

आदित्य ठाकरेंकडे एक रत्नजडीत हारही आहे, याची किंमत १.३३ कोटी रुपये सांगितली आहे. तसेच हिंदू अविभाजित कुटुंबाच्या स्वरुपात त्यांच्याकडे ८४ लाख ३ हजार रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने आहेत.

आदित्यंच्या नावावर राज्यात पाच ठिकाणी शेतजमीन आहे. ही त्यांना वडिलांकडून आली आहे. याची किंमत १.४८ कोटी रुपये आहे. तसेच ठाण्यात दोन दुकाने आहेत. याची किंमत ४.६६ कोटी रुपये सांगितली आहे. अशाप्रकारे आदित्य यांनी स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता एकूण २३.४३ कोटी रुपये होते.

आदित्य ठाकरेंच्या नावावर ४३.७६ लाखांचे कर्जही आहे. आमदार असल्याचे वेतन, व्याज, भाडे आणि लाभांश यातून आपल्याला कमाई होत असल्याचे आदित्य यांनी जाहीर केले आहे.