२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 08:27 PM2024-11-16T20:27:43+5:302024-11-16T20:33:00+5:30

BJP Graph in Maharahstra: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती साकारली होती. आधी काँग्रेसला आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले होते. पण...

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी किरकोळ कारणावरून बोलणी फिस्कटली आणि शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती तुटली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती साकारली होती. आधी काँग्रेसला आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले होते.

आज भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. त्याची ठिणगी २०१४ ला पडली होती आणि २०१९ ला भडकाच उडाला. याकडे प्रत्येक जण वेगळ्या दृष्टीने पाहतो, मात्र युती तुटल्यामुळेच भाजपाला त्यांची महाराष्ट्रातील खरी ताकद कळली, असं देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते म्हणतात. त्यांचं हे लॉजिक पटणारंही आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये १०० हून जास्त जागा जिंकवून त्यांनी आपली वाढलेली ताकद सिद्धही केली आहे.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष या निवडणुकीत वेगवेगळे लढले होते. त्यापूर्वी केंद्रात मोठे सत्तांतर झाले होते. बहुमताने मोदी सरकार निवडून आले होते. याचे वारे काही महिन्यांनी सुरु झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीतही वाहू लागले होते. २००९ ला भाजपाच्या ४६ जागा निवडून आल्या होत्या. तर शिवसेनेच्या ४४. एकत्र लढत असल्याने कोणालाच आपली ताकद समजत नव्हती.

२०१४ ला वेगवेगळे लढल्याने सर्वच पक्षांना त्यांची ताकद समजली. भाजपाने सर्वाधिक १२२ जागा जिंकून आणल्या होत्या. यात ७६ जागांची घसघशीत वाढ झाली होती. परंतु, बहुमत नव्हते. यामुळे शिवसेनेला पुन्हा सोबत घ्यावे लागले होते. तेव्हा देशात मोदी लाट होती, यामुळे महाराष्ट्रात याचा फायदा झाला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. दुष्काळाला तोंड देण्यात आले. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती आहे.

यामुळे भाजपची ताकद आणखी वाढू लागली होती. काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. आता भाजपात सामावून घेण्यास जागा नाही, असेही भाजप नेत्यांना जाहीर करावे लागले एवढा हा ओढा अधिक होता. २०१९ पर्यंत जवळपास २० आमदारांनी भाजप-शिवसेनेची वाट धरली होती.

राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, उदयन राजे भोसले, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील अशी अनेक नावे भाजपासोबत जोडली जात होती. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश करत होते.

नारायण राणे भाजपात आल्याने कोकणात भाजपाला मोठा नेता मिळाला होता. उदयनराजे, धनंजय महाडिकांच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठे पाठबळ मिळाले. राधाकृष्ण विखे पाटलांमुळे नगर पट्ट्यात भाजपाला मोठी ताकद मिळाली. फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात विखे पाटलांना मंत्रिपदही मिळाले. सोलापूर पट्ट्यात विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळेही सोलापूर पट्ट्यात भाजपाला मोठी ताकद मिळाली होती.

भाजपाच्या देशातील आणि राज्यातील प्रभावी नेतृत्वामुळे लोक त्यांच्याशी जोडले जात होते. त्यातूनच अनेक नेत्यांनी भाजपाची वाट धरली. एकेकाळी युतीतील 'छोटा भाऊ' असलेली भाजपा आज विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे.