...म्हणून निकालाला १ आठवडा उलटल्यानंतरही अजून एकाही गावाला सरपंच मिळालेला नाही!

By मुकेश चव्हाण | Published: January 26, 2021 12:27 PM2021-01-26T12:27:20+5:302021-01-26T12:39:30+5:30

राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रमुख पक्ष असलेले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा, मनसे तसेच स्थानिक आघाड्यांना मतदारांनी दिलेला १८ जानेवारीला ईव्हीएममधून समोर आला होता.

काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झालं. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटला तरी अद्यापही सरपंच पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट झालेलं नाही. याचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

महाराष्ट्र सरकारनं सरपंचपदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याचा अर्थ, तुमच्या गावातील सरपंचपद राखीव असणार की नाही, हे सरकार निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यांनी आरक्षण सोडतीची तारीखही जाहीर केली आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार असून, मतदानाच्या दिवसानंतर पुढील ३० दिवसांमध्ये म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती, सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर करण्याच्या निर्णयामुळे या प्रकाराला आळा बसला तसेच मतदानाची टक्केवारी देखील वाढली असं हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के, अनुसूचीत जाती-जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, तर इतर मागासवर्गाला २७ टक्के, आरक्षण दिलं जातं. हे आरक्षण जातीअंतर्गत लिंगगुणोत्तराच्या प्रमाणानुसार दिलं जातं.

आता एकदा का आरक्षण सोडत जाहीर झाली की सरपंचपद मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू होते.त्यासाठी मग विरोधी पॅनेल किंवा गटातील उमेदवारांच्या पळवापळवीचे प्रकार घडतात.

आपल्या बाजूचा उमेदवार दुसऱ्या बाजूला जाऊन मिळाल्यास आणि सरपंच पद हातातून गेल्यास मग अविश्वास ठराव आणले जातात आणि ग्रामपंचायत अस्थिर होते. यामुळे मग सरपंच वारंवार बदलताना दिसतं.