मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:15 PM2024-06-28T12:15:12+5:302024-06-28T12:21:00+5:30

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३१ जागांवर विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असून मविआकडून ३ उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे

संख्याबळाचं गणित पाहिले तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात मात्र तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून मविआ महायुतीतील काही मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून महायुतीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. २ जुलैपर्यंत या जागांसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधान परिषद निवडणूक आहे. त्यात महायुतीकडून ९ उमेदवार जिंकतील असं बोललं जाते. मात्र मविआच्या तिसऱ्या उमेदवारामुळे महायुतीचं गणित बिघडू शकते.

विधान परिषदेच्या जागेसाठी उमेदवार उतरवण्यासाठी आमच्याकडे ११ आमदार आहेत. २ उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीचे असतील. मात्र आम्ही तिसरा उमेदवार उतरवणार आहोत. त्याचे संख्याबळ कसे असेल हे येणाऱ्या काळात दिसेल असं सांगत उद्धव ठाकरे यांनी क्रॉस व्होटिंगबाबत संकेत दिले आहेत.

तसेच राजकीय गणिते ही सार्वजनिकरित्या मांडायची नसतात. आमचा उमेदवार कसा विजयी होणार हे सांगण्याची गरज नाही. आमच्याकडे संख्याबळ आहे असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यातच लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर सत्ताधारी महायुतीला त्यांच्या आमदारांना एकजूट ठेवणे आव्हानात्मक बनलं आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ आमदारांचा ६ वर्षीय कार्यकाळ २७ जुलैला संपत आहेत. त्यामुळेच या जागांवर निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ सदस्यांपैकी सध्या २७४ सदस्यच आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २३ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. विधानसभेत अजित पवार गटाकडे ४१, एकनाथ शिंदेंकडे ४० आणि भाजपाकडे १०३ आमदार आहेत असे मिळून महायुतीकडे १८४ आमदारांचे पाठबळ आहे.

तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे ३७, उद्धवसेनेकडे १३ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे १५ आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला त्यांचे २ उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. परंतु तिसरा उमेदवार विजयी करण्यासाठी मविआला आणखी काही मतांची गरज पडणार आहे.

त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली तर शेकापचे जयंत पाटील हे तिसरे उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी विधान परिषदेसाठी संख्याबळ कसं जुळवणार हे पाहणे गरजेचे आहे.

२०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. संख्याबळ असूनही मविआ उमेदवाराचा पराभव करण्यात भाजपाला यश आलं. या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं होते. त्यानंतरच राज्यात सत्तांतर घडलं होते.