Omicron Variant: महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 10:50 AM2021-12-16T10:50:18+5:302021-12-16T10:57:09+5:30

Coronavirus New Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात पसरला असून अनेक देशात रुग्णसंखेत वाढ होताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवशी ७८ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

भारतातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. मागील २४ तासांत देशात ओमायक्रॉनचे १२ नवीन रुग्ण समोर आले आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ५० च्यावर पोहचली आहे. यात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ३० हून अधिक ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जानेवारीत ओमायक्रॉनच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दिल्लीतही अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत.

मागील २४ तासांत महाराष्ट्रात आणि केरळमध्ये प्रत्येकी ४, तेलंगानामध्ये २, बंगाल १, तामिळनाडू १ असे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. बुधवारी पश्चिम बंगाल, तेलंगाना, तामिळनाडूत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे.

देशात २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत ११ राज्यात हा व्हेरिएंट पसरला आहे. ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात ३२, राजस्थान १७, दिल्ली ६, केरळ ५, गुजरात ४, कर्नाटक ३ आणि तेलंगानामध्ये २ रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. परंतु दिलासादायक बाब म्हणजे यातील २५ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र जानेवारी महिन्यात ओमायक्रॉनची लाट महाराष्ट्रात येण्याची भीती आहे. जानेवारी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप व्यास यांनी कॅबिनेट बैठकीत व्यक्त केली आहे.

नवीन वर्ष आणि क्रिसमस पाहता मुंबईत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. त्याचसोबत इतर निर्बंध लावण्यात आले आहेत. कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात गर्दी करण्यावर बंदी घातली आहे. सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे जीव गेले होते. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी केंद्र सरकारने आतापासून तयारी सुरू केली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता केंद्राने सर्व राज्यांना ऑक्सिजन प्लांटची मॉक ड्रिल करण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, लवकरात लवकर ऑक्सिजन ऑडिट रिपोर्ट पूर्ण करून तो पोर्टलवर अपडेट करण्यात यावा. तसेच या महिन्यात मॉक ड्रिल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारच्या माहितीनुसार, देशात यावेळी ३ हजार २४६ पीएसए प्लांट तयार आहेत. ज्यात ३ हजार ७८३ मेट्रिक टन ऑक्सिजन बनवण्यात येतो. त्याशिवाय आतापर्यंत १.१४ लाखाहून अधिक ऑक्सिजन कंसंट्रेटर्सही पीएम केअर्स फंडातून राज्यांना देण्यात आले आहेत.