शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:19 PM 2022-06-30T18:19:51+5:30 2022-06-30T18:30:07+5:30
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते.
भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला.
विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे गरजेचे होते. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ असं वारंवार आम्ही सांगत होतो. त्यानुसार भाजपा शिवसेनेच्या शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पाठिंबा देईल.
मंत्रिमंडळात शिवसेनेचे शिंदे गटासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपातील नेते यांचा समावेश होईल. मी स्वत: बाहेर असेन. हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझीही असेल. पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
तसेच हिंदुत्ववादी विचारांचे. हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले हिंदुत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचं व्हिजन दाखवलं आहे. त्यावर हे सरकार चालेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळेल. ओबीसींसह दुर्बळ घटकाला न्याय देण्याचं काम सरकार करेल असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाचं एकनाथ शिंदे यांनी आभार मानले, म्हणाले की, आम्ही हा वेगळा निर्णय राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतला. या निर्णयाला भाजपाने पाठिंबा दिला. जवळपास १२३ संख्याबळ भाजपाकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला.
मोठे मन दाखवलं. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचे आभार मानतो असंही शिंदे यांनी सांगितले. जे काही घडले जी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करू. या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्याचं काम करू. इतक्या मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले.