Eknath Shinde : ठाकरेंच्या हातून शिवसेना, धनुष्य बाणही जाणार? एकनाथ शिंदे दावा करण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:03 PM 2022-06-23T12:03:21+5:30 2022-06-23T12:19:35+5:30
Eknath Shinde to hijack Shivsena: उद्धव ठाकरेंनी स्वत: राजीनामा दिला तर काय? एकनाथ शिंदे विधानसभेत अविश्वास ठराव आणणार? कायदेतज्ज्ञ काय म्हणतायत... एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्ताच नाही तर शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाणही काढून घेण्याची तयारी करत आहेत. गुवाहाटीमधून शिंदे यांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे.
यामुळे शिंदे ही आपल्याकडे असलेली खरी शिवसेना आहे, असा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह आपल्याला दिले जावे अशी मागणी करणार आहेत. यामुळे ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि निवडणूक चिन्ह देखील जाण्याची शक्यता आहे. यावर कायदेतज्ज्ञ काय म्हणतात ते पाहुया.
कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, शिंदे यांनी म्हटले म्हणून निवडणूक आयोग लगेच घोषणा करणार नाही. काही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. यासाठी सभागृहात दावा करण्याची गरज नाही.
मेजॉरिटी असल्याने आम्हीच शिवसेना आहोत म्हणून सभागृहात बसायचे. एकनाथ यांच्या गटाचे बाजुला व्हायचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या गटाला सध्याच्या सरकारसोबत बसायचे नाहीय. यामुळे त्यांना नो कॉन्फिडन्स प्रस्ताव आणावा लागेल, असा पर्याय असल्याचे अणे म्हणाले.
शिवसेना ही रजिस्टर्ड पार्टी आहे, हे नाव कोणी वापरावे याचा वाद होऊ शकतो. त्यावर सुनावणी होऊ शकते. केंद्रीय आयोगाला जरी शिंदे यांनी कळविले की ही खरी शिवसेना आहे, तरी केंद्रीय आयोग हा निर्णय ज्या गटावर परिणाम होईल म्हणजेच ठाकरे गटाला विचारून घेईल, त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल, असेही अणे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी जर म्हटले की आम्ही शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे, तर उद्दव ठाकरेंनी घेतलेला निर्णय बेकायदा ठरविता येतो. बहुमत त्यांच्या बाजुने असेल तर ठाकरे निर्णय घेणारे कोण, असा सवालही शिंदे गट उपस्थित करू शकतो.
उद्धव ठाकरेंनी स्वत: राजीनामा दिला तर मुख्यमंत्री पद रिक्त होते. सरकार पडत नाही. यामुळे या सरकारमध्ये कोण सहभागी होणार ते ठरविता येईल. जर शिंदे आणि ठाकरेंमध्ये वाद वाढला तर नो कॉन्फिडन्स मोशन आणता येऊ शकते, अशा शक्यता अणे यांनी व्यक्त केल्या.