Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली? हे आहेत आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:41 PM 2022-02-23T17:41:48+5:30 2022-02-23T17:48:34+5:30
Nawab Malik Arrest allegations by ED: मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. नवाब मलिक यांना आज पहाटे ईडीने चौकशी साठी ताब्यात घेतले आणि दुपारनंतर अटक केली. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सुरुवातीला ईडीच्या कार्यालयासमोर आणि नंतर सत्र न्यायालयासमोर जमले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. अशावेळी मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.
दरम्यान मलिक यांच्यावर ईडीने काय आरोप ठेवले आहे, याची माहिती मिळाली आहे. ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली.
3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊद विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाऊद बद्दल न्यायालयाला अधिक सांगायला नको. मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुह्यांत दाऊदचा सहभाग आहे, असे सिंग यांनी न्यायालयास सांगितले. यानंतर त्यांनी मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत हे न्यायालयाला पटवून दिले.
दाऊद इब्राहिम हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत सोबत काम करतो. त्याची बहीण हसीना पारकर दाऊद चा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदच्या बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप सिंग यांनी केला.
दाऊदची २०० कोटींची संपत्ती मलिक यांनी कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. यासाठी ५५ लाखांचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीचे मालकीहक्क आहेत. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी न्यायालयात केला.
कुर्ला येथील संपत्ती मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात होती. कुर्ला येथील प्रॉपर्टी ही मुळात डी गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. सलीम पटेलची ही प्रॉपर्टी होती आणि त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध होता. ती संपत्ती आज मलिक यांच्या मालकीच्या कंपनीकडे आहे, असा दावा सिंग यांनी केला.
कुर्ल्याची गोवा कंपाऊंडची ही मालमत्ता मुनिरा आणि मरियम यांची आहे. त्या खऱ्या मालक आहेत. हसीनाने ती मालमत्ता ताब्यात घेतली होती. हसीनाचा आता मृत्यू झाला, असेही सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मलिक यांना ईडीच्या कोठडीत द्यावे अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
सिल्ह्वर ओकवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत जर मलिक यांचा राजीनामा घेतला तर त्यांच्या खात्याचा पदभार कोणाकडे द्यायचा याची देखील चर्चा झाल्याचे समजते.