Maharashtra Political Crisis: राज अन् उद्धव ठाकरेंना धक्का! मनसे मुंबई सचिव, शिवसेनेचे पदाधिकारी, ३०० कार्यकर्ते शिंदे गटात By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 02:20 PM 2022-08-17T14:20:51+5:30 2022-08-17T14:29:53+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नसून, मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठका घेत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे नांदेडचे दोन जिल्हाप्रमुख शेकडो समर्थकांसह मुंबईला रवाना झाले. यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश केला. साधारणतः ३०० शिवसैनिक हे वेगवेगळ्या गाड्यांनी तर काही जण रेल्वेने मुंबईत आल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा या सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला, अशी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सांगितले.
नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यांतील पोलीस पाटील संघटनांच्या सदस्यांनी देखील याप्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या मागण्या सोडवण्याकरिता भेट घेतली. या दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामांना कोणतीही कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यासमयी बोलताना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड दौरा केला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या धावपळीत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा घाई गडबडीत आटोपला होता. त्या दौऱ्यात अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी मुंबईत येऊन शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील तीन जिल्हाप्रमुखांपैकी दोन जिल्हाप्रमुख शिंदे गटासोबत गेले आहेत. तर जिल्ह्यातील एक आमदार आणि हिंगोलीचे खासदार देखील शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे नांदेडच्या शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी शिंदे गटात प्रवेश करत युती सरकारला समर्थन दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबतही एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती देत काही फोटो शेअर केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई विभागाचे सचिव अल्ताफ खान यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. अल्ताफ खान यांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यासाठी आणलेली चादर याप्रसंगी माझ्यासमोर सादर केली. ही चादर लवकरच अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवून महाराष्ट्राला सुख शांती आणि स्थैर्य लाभावे यासाठी प्रार्थना केली जाणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यासोबत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी खास जेवणाचा डबा भेट देत युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच वर्सोवा येथील कोळी बांधवांनी देखील युती सरकारला पाठींबा देत त्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्या सर्व मागण्या नक्की पुर्ण करू असे सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.