New crisis for Shinde-Fadnavis government due to secret explosion of Bacchu Kadu
आता लढाई आरपारची! बच्चू कडूंच्या गौप्यस्फोटानं शिंदे-फडणवीस सरकारवर नवं संकट By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:08 PM2022-10-28T12:08:47+5:302022-10-28T12:15:35+5:30Join usJoin usNext राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे मिळून एकूण ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर विरोधकांकडून सातत्याने खोके घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही ५० खोके, एकदम ओक्के अशा घोषणाबाजी करण्यात आली होती. विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपावर सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात आले. परंतु आता सत्तेतच असणाऱ्या २ आमदारांमध्ये खोक्यावरून जुंपली आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला पोहचला आहे की, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचं अस्तित्वही पणाला लागलं आहे. बच्चू कडू यांनी ७-८ आमदार माझ्या संपर्कात असून रवी राणा यांनी केलेल्या आरोपामुळे सर्वजण नाराज आहेत. १ तारखेपर्यंत जर रवी राणा यांनी पुरावे दिले नाहीतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले नाही तर आम्ही वेगळा विचार करू असा इशाराच कडू यांनी दिला आहे. त्यात आता बच्चू कडू यांच्या संपर्कात असलेले ते आमदार कोणते असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं की, धनुष्यबाणावर निवडून आलेले आणि अपक्ष आमदार हे दोन्ही संपर्कात आहेत. हा सोबतचा विषय नाही. रवी राणांनी जो आरोप केला त्यावरून सगळे नाराज आहेत. हा आरोप गंभीर आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मी पैसे घेतले असा आरोप रवी राणा करतायेत. मग हे पैसे दिले कुणी? जयललिता, मायावती, अखिलेश यादवांनी दिले का? या आरोपांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. मी चौकशीला तयार आहे. त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी होईल. लागलेला डाग पुसला पाहिजे असं बच्चू कडू यांनी सांगितले. रवी राणा जे आरोप करताय त्यामागे काय उद्देश आहे हे समोर येईल. आता ही लढाई आरपारची आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करत असाल तर आम्ही आंडूपांडू नाही. जिथे मोकळं रान आहे. ती सुपीक करण्याचं काम आम्ही करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालय द्या असं म्हटलं आहे. त्यासाठी अट्टाहास केला नाही. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. घर पेटलं तर त्याचे फोटो काढत बसणार आहे का? रवी राणा वात्रट आहे. त्यामुळे त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी समज देतो असं म्हटलं. फोन केला तरी तो ऐकत नाही असं कडू यांनी म्हटलं. त्याचसोबत राणांनी केलेला आरोप माझ्या एकट्यावर नसून मुख्यमंत्री शिंदे हेदेखील त्यात आरोपी आहेत. पैसे कुणी दिले? रवी राणांनी खुलासा करावा. हा आरोपाचा विषय आहे. सरकार, सत्ता विषय नाही. रवी राणा म्हणजे सरकार नाही. मंत्रिपदाच्या वरचा विषय आहे. मीच नाही तर मंत्रिपद काय कामाचं? त्यांनी आरोप केल्यानंतर मी बोललो असं कडू यांनी स्पष्ट केले. सध्या शिवसेनेचे २ तृतीयांश आमदार शिंदे यांच्या बाजूने आहे. सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेच्या ४० पैकी ३७ आमदार शिंदेसोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या संपर्कात असणारे धनुष्यबाणावरील आमदारांनी वेगळा विचार केला तर शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात येऊ शकते. त्यामुळे रवी राणा-बच्चू कडू वादामुळे सरकारसमोर नवं संकट उभं राहिल्याची चर्चा आहे. टॅग्स :बच्चू कडूरवी राणाBacchu KaduRavi Rana