PHOTO: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ; गोंदिया, भंडारा, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पूरस्थिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:56 AM 2022-08-10T10:56:13+5:30 2022-08-10T11:07:05+5:30
Rain Updates in Maharashtra: दिलासा देणारी बाब म्हणजे समुद्राला उधान असुनही मुंबई अद्याप तुंबलेली नाही. तरीदेखील येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून कोकण पट्टा, घाटमाथा ते विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आणखी दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिलासा देणारी बाब म्हणजे समुद्राला उधान असुनही मुंबई अद्याप तुंबलेली नाही. तरीदेखील येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्यात देखील रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाने आता थोडी उसंत घेतली आहे. शहरातील काही भागात सूर्यदर्शनही झाले.
कोल्हापूर सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरस्थिती उद्भवली आहे. सर्व प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठातील परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या आज बुधवारी व उद्या (गुरुवारी) होणाऱ्या आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकांनी जाहीर केले आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे. गगनबावडा घाट रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
गोंदिया सर्वाधिक प्रभावित यानंतर नागपूर विद्यापीठाने देखील आज होणाऱ्या परीक्षा रद्द करून पुढील तारीख नंतर घोषित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गोंदियातील तिरोडा तालुक्यातील दहा गावांना पुराचा फटका बसला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तिरोडा तालुक्यातील काशी घाट गराडा ,नाल्यावर पाच फुट पाणी असून खमारी, चिखली गावात पाणी शिरले, काही घरे पाण्याखाली तर काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सलग अतिवृष्टी सुरू असल्यामुळे नदी-नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. ग्रामीण व शहरी भागांतील अनेक परिसर पाण्याखाली गेले असून शेतकरी, नागरिक व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील राज्य मार्गावरील पुलावर पाणी चढल्याने आणि शेजारील माती वाहून गेल्याने गोंदिया तिरोडा मार्ग बंद झालेला आहे. तसेच गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव-बोळुंदा मार्ग बंद झालेला आहे. बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो झालेले आहे. टेमणी कटंगी मार्गावरील पांगोली नदीला पुर आल्याने मार्ग बंद झालेला आहे. गोरेगाव तालुक्यातील पुरगाव येथे तलावाची पाळ फुटल्याने गावात पाणी शिरले आहे.
भंडारा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसचा जोर कायम. मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर तुमसर तालुक्यात पुरामुळे बंद. भंडारा - तुमसर मार्गावर मोहाडी येथील नाल्याच्या पुलावर तीन फूट पाणी. मोहाडी येथील १७ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले. रात्रभर झालेल्या पावसाने २६ ग्रामीण मार्ग बंद.
ठाणे: पावसाने दोन दिवसापासून जोरदार आगमन केले आहे. ठाणे शहरातही रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सखलभागात पाणी साचल्याचे दृश्य दिसून आले.