गुड न्यूज! आता राज्यातील हाफकिन करणार कोरोना लस उत्पादन; PM मोदींचा हिरवा कंदील By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:43 PM 2021-03-17T20:43:12+5:30 2021-03-17T20:49:34+5:30
corona vaccine: राज्यात हाफकिनला कोरोना लस उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल, असे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव (CoronaVirus Cases) वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, रोजचा आकडा १७ हजारांच्या पार गेला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील, असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला कोरोना लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंती केली होती.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचना लगेचच उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल, असे जाहीर केले. (pm modi accepted the request of cm uddhav thackeray to start corona vaccine production in haffkine)
त्यामुळे आता राज्यात हाफकिनला कोरोना लस (corona vaccine) उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. भारत बायोटेकच्या कोरोना लसीची निर्मिती हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड करणार असल्याचे सांगितले जात आहे.
हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोव्हिड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी, जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश तत्त्वार हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
लसीकरणासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे. अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रात अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. परंतु, त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे, हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल. दररोज तीन लाखांपर्यंत लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रात सरासरी दररोज १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. परंतु, ते आणखीही वाढवावे असे सांगण्यात आले असून, राज्यात आतापर्यंत ३५ लाख ५२ हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोरोनाची लढाई लढली आहे. मध्यंतरीच्या काळात दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती. मात्र, काही जिल्ह्यांत आता ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. काही राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून, याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
पंतप्रधानांनी यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत असे उत्तर दिले. कोरोना बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वांना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
जनतेला पॅनिक मोडमध्ये आणता कामा नये. भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाहीए. कोरोना संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. गतवर्षीच्या अनुभवातून शिकून नवीन गोष्टी अमलात आणायला हव्यात. राज्यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी यावेळी केल्या.
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली आणि कोरोनाचा कहर असाच कायम राहिला, तर परिस्थिती हाताळणे कठीण होईल. कोरोना रोखणे किंवा कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवणे आताच्या घडीला सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
देशात दररोज किमान ३० लाख नागरिकांना कोरना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच राज्यांनी कोरोना लसीचा डोस फुकट जाणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.