पीएमसी बँकेबाहेर रांगा; पैशांचं काय होणार ते खातेदारांना समजेना! By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 01:51 PM 2019-09-24T13:51:28+5:30 2019-09-24T13:59:12+5:30
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.
मंगळवारी (24 सप्टेंबर) सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक चिंतीत झाले आहेत. पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत तर काही ग्राहक बँकेत जमले असून, त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम 35 अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेर बँकेचे ऑनलाईन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही.
पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.
निर्बंधांच्या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खर्चासाठीही ठरावीक मर्यादेपर्यंतच रक्कम खर्च करता येईल.
पीएमसी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर काही निर्बंध घातले आहेत.
बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली असल्याची त्यांनी माहिती दिली.
पुढील सहा महिन्याच्या आत अनियमितेमधील या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढील सहा महिन्यात या त्रुटी दूर करून बँक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जॉय थॉमस यांनी या काळात ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त करून बँकेला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.