ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. 11- शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेनं निषेध मोर्चा काढला. बुधवारी (10 मे) रावसाहेब दानवे यांची शेतकऱ्यांबाबत बोलताना पुन्हा जीभ घसरली. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याबद्दल दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांपाठोपाठ भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेनंही दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या गाढवावरुन धिंड काढली. डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, तात्या माने यांच्यासहीत अन्य शिवसैनिक उपस्थित होते. रावसाहेब दानवेंची जीभ घसरलीबुधवारी जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात दानवे यांनी शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने, तूर खरेदीबाबत आम्ही लोकांना काय उत्तर द्यायचे, असा सवाल केला. या अनपेक्षित प्रश्नाने दानवेंचा पारा चढला. ते म्हणाले, एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले. कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, असली रडगाणी आता बंद करा, अशी मुक्ताफळे दानवे यांनी उधळली. सत्तेची नशा डोक्यात गेली - विरोधकराज्यात तूर खरेदीचा मुद्दा तापलेला असताना, खा.दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. खा. दानवे यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला. दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. - खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यापूर्वीही वादग्रस्त व्यक्तव्यामुळे दानवे अडचणीत आले होते. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या थांबणार, अशी लेखी हमी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती. वक्तव्याचा विपर्यास - दानवे दरम्यान, चौफेर टीका सुरू झाल्यानंतर दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कार्यकर्त्यांना उद्देशून आपण ते वक्तव्य केले होते. शेतकरी हितासाठीच भाजपा सरकार बांधील असून, त्या दृष्टीनेच निर्णय घेतले जात आहेत, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. अहमदनगर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर लघुशंका करत शिवसेनेने निषेध नोंदवला. शेतकऱ्यांना साले म्हणणारे दानवे हे तालिबानी असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. सक्कर चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. परभणी : शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत आंदोलन केले. सांगोला येथेही शिवसैनिकांनी बस स्थानकसमोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी तालुका प्रमुख मधुकर बनसोडे यांनी दानवे यांना शिवसैनिक महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे.