ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 3 - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना दौंड आणि इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंचन भवन इमारतीत घुसून तोडफोड केली. पुणे शहराला पुरेसा पाणीसाठा नसताना कालव्यातून पाणी सोडण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हे पाऊल उचलल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. पाणी सोडण्यास विरोध नसून पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हुकूमशाही पध्दतीला विरोध असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले. खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आमदार आणि महापालिका पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, केवळ पालक मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दोघांनीच हा निर्णय घेतला.