राज ठाकरेंची मनसे अन् एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार; भाजपाची दोघांना साथ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:38 PM2022-09-06T13:38:07+5:302022-09-06T13:46:18+5:30

राज्यातील राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. जून २०२२ पर्यंत राज्यात असणारं महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही दिवसांत कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी सरकारची साथ सोडल्यानं सरकार अल्पमतात गेले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले.

राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. तसेच खरी शिवसेना कुणाची हा वादही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात.

सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रीत आहे. गेली ३ दशके महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व कायम आहे. मात्र यंदा शिवसेनेतील फूट आणि महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजपानं कसलेली कंबर यामुळे निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

याच राजकीय वर्तुळात चर्चेत असणारे नेते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे. राज ठाकरे यांच्या मनसेचा राजकीय पटलावर आकडेवारील मोठा करिश्मा नसला तरी राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले राज ठाकरे हेदेखील लाखोंच्या सभा सहजपणे भरवून ती गाजवू शकतात.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातही युती होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिंदे यांनी अलीकडेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात गणेश दर्शन केले. परंतु त्यावेळी शिंदे-राज यांच्यात काही गप्पाही रंगल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद ठाण्यापुरती मर्यादित आहे. इतर ठिकाणी स्थानिक आमदारांमुळे शिंदे यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंशी मुकाबला करण्यासाठी शिंदे यांना तगडं नेतृत्वसोबत लागण्याची शक्यता आहे. त्यात राज ठाकरेंचा प्रामुख्याने नाव घेतले जात आहे.

शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. मध्यंतरीच्या काळात शिंदेंच्या विनंतीवरून राज ठाकरेंनी ठाणे मनपात शिवसेनेची मदत केली होती. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात शिंदे गटाविरोधात प्रकरण सुरू आहे. त्यात शिंदे गटाच्या विलिनीकरणाचा मुद्दा आल्यास राज ठाकरेंच्या मनसेत हा गट विलीन होऊ शकतो. तोच त्यांना चांगला पर्याय ठरेल असं राजकीय विश्लेषक मानतात.

राज ठाकरे यांच्या मनसेलाही राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकला चलो रे भूमिकेतून बाहेर पडावं लागणार आहे. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे युती होईल असं बोलले जाते. परंतु यावर कुणीही अधिकृत भाष्य करत नाही. मात्र त्याचवेळी राज आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे मनसे-शिंदे गट एकत्र येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावल्यानंतर राज ठाकरेही वर्षा बंगल्यावर शिंदेंच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंशी असलेला दुरावा आणि राज ठाकरेंसोबतची जवळीक यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

सध्या शिंदे गटासोबत मुंबईतील प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर हे आमदार आणि राहुल शेवाळे खासदार आहेत. मात्र प्रभावी राजकारणासाठी राज ठाकरेंचा आक्रमक चेहरा सोबतीला घेतला तर त्याचा शिंदे गटाला फायदा होऊ शकतो अशी कुजबूज शिंदे गटातील आमदारांमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल.