संभाजी भिडेंचे समर्थक रस्त्यावर By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 01:04 PM 2018-03-28T13:04:18+5:30 2018-03-28T13:04:18+5:30
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही असा दावा करत शिवप्रतिष्ठानने सांगलीसह राज्यभरात सन्मान मोर्चाचे आयोजन केले.
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई , यवतमाळ, बेळगाव, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदूर्ग या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून या मोर्चाची सुरूवात झाली होती.
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटेंना अटक झाली असली तरी संभाजी भिडेंना अद्याप अटक झालेली नाही. संभाजी भिडेंच्या अटकेसाठी सोमवारी आंबेडकरवादी संघटनांनी मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता.
मुंबई आणि पुण्यातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ‘शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये’, म्हणून पुणे पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल शक्तीप्रदर्शन करीत पथसंचलनही केले होते.
संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे आरोप मागे घ्या, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती.