Uddhav Thackeray Vs. Narayan Rane: शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात एवढी 'दुश्मनी' का?; कधी, कसा उडाला 'खटका'? By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:29 PM 2021-08-21T14:29:55+5:30 2021-08-21T14:56:15+5:30
खरं तर एक पक्ष सोडणं, नव्या पक्षात जाणं, आधीच्या पक्षनेतृत्वाला लक्ष्य करणं, त्याला प्रत्युत्तर येणं, हे राजकारणात होतच असतं. पण मग, नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातली वैर इतक्या वर्षांनंतरही का संपत नाहीए? ''शिवसेनेत पदांचा बाजार मांडला आहे'', असा सनसनाटी आरोप २००५ मध्ये रंगशारदा सभागृहातील भर मेळाव्यात करून माजी मुख्यमंत्री आणि तेव्हाचे शिवसेनेचे आक्रमक नेते नारायण राणे यांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. हा आरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर नव्हता, तर उद्धव ठाकरेंवर असलेल्या राणेंच्या रागाचा तो स्फोट होता, असं म्हटलं जातं. या स्फोटाचे हादरे गेल्या १५ वर्षांत अनेकदा जाणवलेत, राणे विरुद्ध ठाकरे अशा संघर्षाची ठिणगीही खूपदा पडलीय आणि येत्या काळात हा सामना आणखी चुरशीचा होण्याची चिन्हं आहेत. जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर काही वेळातच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धिकरण केलं. यातून राणे आणि शिवसेनेतील 'दुश्मनी'चा सहज अंदाज येऊ शकतो.
खरं तर एक पक्ष सोडणं, नव्या पक्षात जाणं, आधीच्या पक्षनेतृत्वाला लक्ष्य करणं, त्याला प्रत्युत्तर येणं, हे राजकारणात होतच असतं. पण, ही नाराजी, टीकेची धार हळूहळू कमी होत जाते. तो पक्ष आणि ती व्यक्ती दोघंही कालांतराने वाद विसरतात किंवा झालं गेलं बाजूला ठेवतात. छगन भुजबळ यांनीही शिवसेनेशी बंड केलं होतं, पण आज ते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातही आहेत आणि ठाकरेंशी त्यांचे व्यक्तिगत संबंधही चांगले आहेत. मग, नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातली वैर इतक्या वर्षांनंतरही का संपत नाहीए? उद्धव ठाकरेंच्या उदयानंतर शिवसेनेचा चेहरामोहरा बदलू लागला. काही प्रमाणात शह-काटशहाचं राजकारणही सुरू झालं. दोन गट पडल्याचं दिसू लागलं. त्यात नारायण राणे दुसऱ्या गटात होते. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांची जी यादी जाहीर झाली, त्यात १५ राणेसमर्थकांना वगळण्यात आलं होतं. इथे नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात पहिला खटका उडाला होता.
स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं होतं. स्वाभाविकच, शिवसेनेतील त्यांचं वजन वाढलं होतं. मुख्यमंत्री म्हणूनही राणेंनी अल्पावधीतच प्रशासनावर चांगली पकड घेतली होती. स्वाभाविकच, त्यांचं वर्चस्व वाढणं 'गट क्र. १' साठी डोकेदुखी ठरणारं होतं. याच कारणावरून आपल्या समर्थकांची तिकिटं कापली, २००२ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार पाडण्यासाठी आपण धडपडत असताना एकाकी पाडलं गेलं आणि कणकवलीचं घर जाळलं तेव्हा कुणीही मदतीला आलं नाही, हे राणेंच्या डोक्यात फिट्ट बसलं आणि ते प्रचंड दुखावले.
त्यानंतर, बाळासाहेबांचं वाढतं वय आणि तब्येतीच्या तक्रारी यामुळे उद्धव ठाकरेंनी सूत्रं स्वीकारली. भिन्न स्वभाव, भिन्न कार्यशैली आणि काही वर्षांतील घडामोडी पाहता, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची 'युती' होणं कठीणच होतं. उलट, त्यांच्यातील दरी वाढतच गेली आणि २००५ मध्ये राणेंनी शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' केला. उद्धव ठाकरे, बदललेली शिवसेना, आपल्यावर झालेला अन्याय यावरून त्यांनी अक्षरशः रान पेटवलं. पुढचे बरेच दिवस मंत्रालयासमोरचा 'बी-३' बंगला राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. ठाकरेंविरोधात उघडपणे आणि अत्यंत आक्रमक बोलणारा नेता महाराष्ट्र पहिल्यांदाच पाहत होता. विशेष म्हणजे, राणेंसोबत काही आमदारांचं बळ आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यामुळे ते शिवसेनेला अक्षरशः भिडले होते आणि शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट दिसत होतं.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेनं आपलं ब्रह्मास्त्र - अर्थात बाळासाहेबांचा आधार घेऊन राणेंची कोंडी करायचा प्रयत्न केला. बाळासाहेब बोलले तर राणे निरुत्तर होतील, असं शिवसेनेला वाटलं होतं. पण, त्यांचा अंदाज सपशेल चुकला. उलट, हे भांडण वैयक्तिक पातळीवर आलं. खासगी आयुष्यावरून टीका-टिप्पणी झाली आणि त्यावेळी झालेल्या जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत. छगन भुजबळ यांचं बंड बाळासाहेबांशी होतं. 'लखोबा लोखंडे' विरुद्ध 'टी. बाळू' असा सामना तेव्हा रंगला होता. तेही खटले दाखल करण्यापर्यंत गेलं होतं. पण, बाळासाहेबांचं वय, तब्येत बघता 'इमोशनली' ते भांडण मिटलं. झालं गेलं विसरून छगन भुजबळांनी पुन्हा 'मातोश्री'शी सलोखा निर्माण केला. नारायण राणेंच्या बाबतीत इथे मोठा फरक आहे. त्यांचा 'पंगा' उद्धव ठाकरेंशी आहे आणि आज उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्रीही. राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडानंतर, शिवसेना टिकेल की नाही, अशी चर्चा होती. पण, उद्धव यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध करून पक्ष टिकवलाही अन् वाढवलाही. याउलट, नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये फारसा करिश्मा दाखवता आला नाही आणि आता भाजपामध्ये ते आपलं स्थान कसं निर्माण करतात, हे पाहावं लागणार आहे.
स्वाभाविकच, उद्धव यांचं पारडं सध्या जड आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपालाही ते पुरून उरताना दिसतात. हे चित्र राणेंचा 'स्वाभिमान' दुखावणारंच आहे. म्हणूनच, शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा, अस्मितेचा विषय असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याच्या इराद्यानं ते मैदानात उतरले आहेत. अर्थात, शिवसेनाही पूर्ण तयारीनिशीच ही लढाई लढेल. उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वीसारखी आक्रमक नाही किंवा सत्तेत असल्यानं त्यांच्यावर काही बंधनं आली आहेत; हे बरोबर असलं तरी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणावरून ते आता १०० टक्के राजकारण करतात, हा बदलही महत्त्वाचा आहे. 'आला अंगावर, घेतला शिंगावर', 'अरेला कारे', 'बघतो काय रागाने...', यात दोन्ही गट माहीर आहेत. त्यांच्यात शाब्दिक चकमकही जोरदार रंगेल. राणेंचा बेधडकपणा + भाजपाची रणनीती आणि शिवसेनेच्या अस्मितेच्या राजकारणासोबत असलेली 'पवारनीती', यामुळे मुंबईची निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल, यात शंकाच नाही!