Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढलं टेन्शन; जाणून घ्या, कडक निर्बंधांचे नवे नियम By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:45 PM 2021-06-28T12:45:41+5:30 2021-06-28T12:50:36+5:30
Delta Plus variant in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने खबरदारी घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात सोमवारपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील सर्व जिल्हे आता तिसऱ्या स्तरात टाकण्यात आले आहेत. मागील काही आकड्यांचा विचार करता २५ जिल्हे तिसऱ्या स्तरात आले आहेत.
कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता सरकारने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील ५ स्तरातील जिल्ह्यांमध्ये बदल करून आता पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे.
मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. आधी ठाणे आणि नवी मुंबई यांचा दुसऱ्या स्तरातील सूट होती. परंतु आता याठिकाणीही निर्बंध आणखी वाढवण्यात आले आहेत. लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तिसऱ्या स्तरातील दुकानांना संध्याकाळी ४ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी आहे. मॉल पूर्णत:बंद राहतील. व्यापाऱ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनचे वीरेन शहा म्हणाले की, व्यापारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने किमान संध्याकाळी ८ पर्यंत दुकानं उघडण्याची परवानगी द्यायला हवी
काय सुरू राहणार आवश्यक दुकानं दररोज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, अत्यावश्यक नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, हॉटेल ५० टक्के आसन क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, त्यानंतर पार्सल आणि ऑनलाईन डिलिवरी केली जाऊ शकते.
काय बंद राहणार जमाव अथवा मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी असेल, सिनेमा गृह बंद राहतील, जर एखाद्या ठिकाणी खाण्या -पिण्या सह संमेलन असेल आणि त्या ठिकाणी मास्क काढावे लागत असतील, तर अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेले मार्गदर्शक तत्त्वे यांची अंमलबजावणी केली जाईल.
एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथले कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या नियतकालिक चाचण्या आवश्यक असतील. कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.
बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यापेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संमेलन नियोजित केले गेले असतील तर या दोन मेळाव्यादरम्यान पुरेशा कालावधी असावा
धार्मिक स्थळ की, जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, त्या ठिकाणी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.
डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंट्सचा प्रसार होत असून पुढील ४ ते ६ आठवड्यात मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर अधिक घातक रूपात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे अशी चिंता राज्य सरकारने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः आणखी कठोर बंधने लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या विषाणूच्या म्युटेशन्स आणि त्यात सातत्याने होत असलेली उत्क्रांती पाहता येत्या काळात कल्पनेपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.