Sanjay Raut Arrested : संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड ते अटक असा होता घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:21 AM2022-08-01T09:21:54+5:302022-08-01T09:33:09+5:30

रविवारी रात्री उशिरा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापा टाकला.

ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात  चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.

रविवारी सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी सीआयएसएफसोबत राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी त्यांनी चौकशी आणि झाडाझडतीला सुरूवात केली. जवळपास ९ तास ईडीची टीम तिकडे होती.

जेव्हा शिवसैनिकांना याची माहिती मिळाली तेव्हा हळूहळू त्यांनी राऊत यांच्या घराबाहेर जमण्यास सुरूवात केली. प्रकरण इतकं वाढलं की शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवावं लागलं.

छाप्यांदरम्यान राऊत यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीटही करण्यात आले. आपण शिवसेना सोडणार नाही. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहोत आणि झुकणार नाही, असंही ते म्हणाले.

ईडीची कारवाई सुरू असतानाच तब्बल सहा तासांनंतर संजय राऊत हे घराच्या खिडकीकडे आले. त्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या समर्थकांना हात दाखवला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधूही उपस्थित होते.

ईडीच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी संजय राऊत यांच्या आईनं त्यांना ओवाळलं. तसंच त्यांनी आपल्या आईच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गाडीतून ईडी कार्यालयाकडे निघून गेले.

घरातून ईडी कार्यालयाकडे जाताना आपल्या गाडीच्या रुफ टॉपमधून ते बाहेर आले. तसंच त्यांनी आपल्या गमछा हवेत फडकावला.

ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट झालं. तुम्ही त्या व्यक्तीला कधी हरवू शकत नाही, जो पराभव मानत नाही, झुकणार नाही, जय महराष्ट्र असं ट्वीट करण्यात आलं होतं.

कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना रात्री १२ वाजता ईडीनं अटक केली.