महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना, कॉल केला की मिळणार मदत; टोल फ्री हेल्पलाईन जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:52 IST2025-01-24T18:48:06+5:302025-01-24T18:52:13+5:30
हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची एल्डरलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.
या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.
जनसेवा फाऊंडेशनच्या क्षेत्रीय प्रतिनिधींनी जिल्ह्यात काम सुरू केले आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रयत्न सुरु आहे.
राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालवण्यात येत आहे.
ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीचे व जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी म्हणून राजेंद्र आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा काम पाहत आहे.
हेल्पलाइनवर ज्येष्ठांना पुढील सुविधा लगेच उपलब्ध- ज्येष्ठ नागिरकांना आरोग्याबाबत जागरुकता, निदान, उपचार, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक आदीची माहिती मिळेल. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजाऱ्यांशी विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन कॉल केल्यावर लगेच मिळेल. एल्डर लाईन १४५६७ हा टोल फ्री आहे. एल्डर लाईन सर्व दिवस सुरु असते. हेल्पलाईनची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असते. २६ जानेवारी, २ ऑक्टोबर आणि १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सुटीच्या दिवशी ही सेवा बंद राहील.