Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार! By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 01:31 PM 2022-08-03T13:31:34+5:30 2022-08-03T13:37:38+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेवरील संकाटात आदित्य ठाकरेंनंतर आता तेजस ठाकरे सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंपुढे आता नेमके कोणते ऑप्शन आहेत? जाणून घ्या... एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे. यासाठीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यातच आता मुंबई महानगरपालिकेसह (BMC Election 2022) अन्य ठिकाणच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करून शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह फुंकण्यासाठी काय काय केले जाऊ शकते. बंडखोरांना कोणते पर्याय सक्षमपणे उभे केले जाऊ शकतात, यावर भर दिला जात असून, पक्षातील विविध स्तरावरील पदाधिकारी नेते यांच्या बैठकांचे मोठे सत्र सुरू झाले आहेत. तसेच अनेकांना शिवसेना आणण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार असे सांगितले जात आहे.
एकीकडे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) राज्यातील विविध भागांचे दौरे करत असताना उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी कोल्हापूर दौरा उरकल्यानंतर कार्ला गडावर येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नसले तरी त्याने शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे हे आता राजकारणात सक्रिय होऊ शकतात. तेजस ठाकरे यांच्याभोवती 'ब्रँड ठाकरे'चे वलय असल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी उपजतच आकर्षण आहे. त्यामुळे आता शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरे सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जात आहे. यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नव्हते. काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचे दिसून आले होते. परंतु, आता शिवसेनेचे बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या विराट सभेवेळीही तेजस ठाकरे उपस्थित होते. त्याचवेळी तेजस ठाकरे यांना लॉंच करण्याबाबतही राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या.
सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे. त्यात शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट पडले आहेत. मात्र जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबियांवर संकट आले त्या त्या वेळी ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकवीरेच्या पायावर माथा टेकवत यश मिळावे, असे साकडे घातले व यश मिळाल्यानंतर गडावर येऊन नवस फेडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट सक्रीय झाले आहे. मागील निवडणुकीत थोडक्यासाठी भाजप विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र, आता काही झाले तरी निकराची झुंज देऊन मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याची भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. यातच शिंदे गट येऊन मिळाल्याने त्याचा फायदाही भाजप करून घेईल, असे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात शिवसेनेला हादरा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाने मुंबईतही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांना गळाला लावण्याची तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना 'ऑपरेशन मुंबई'ची जबाबदारी दिली आहे.