सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 07:25 PM 2021-03-22T19:25:37+5:30 2021-03-22T19:33:06+5:30
राज्यात सुरू असलेल्या प्रकरणांवरून भाजप (BJP) करत असलेल्या टीकेला शिवसेनेने (Shiv Sena) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (shiv sena leader bhaskar jadhav replied bjp over param bir singh letter and sachin vaze case) प्रसिद्ध आणि लोकप्रिय उद्योगपती मुकेश अंबानी (mukesh ambani bomb scare) यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये सापडलेली स्फोटके, यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक, या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांची झालेली उचलबांगडी आणि यावर कळस म्हणून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
विरोधक अर्थात भाजपकडून (BJP) तसेच अन्य पक्षांकडून महाविकास आघाडी सरकार, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरू लागली आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (mansukh hiren death case) महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपास करीत आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.
राज्यात भाजप सरकार आले नाही, तर २०२४ मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही, याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस असून, याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.
भाजप बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून मोठी झाली झाली असून, त्यांनीही ही बाब आता ध्यानात ठेवावी. पण, भाजप आता तीच वेल संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.
विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. वाझेंनी वर्षावर वास्तव्य केले होते. या साऱ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी राणेंनी केली होती.
काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रातून केला आहे.
तसेच या प्रकरणी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पुन्हा मोठा दावा केला आहे. तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असे परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
एवढेच नव्हे तर, परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारीची निःपक्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
दरम्यान, भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे, असे आम्ही समजू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्यासह रिपाइं नेते आणि रामदास आठवले यांनीही केंद्रीयमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. अनिल देशमुख प्रकरणाचे लोकसभेतही पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.
एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणे, हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघाले आहे अशी परिस्थिती आहे. शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत, असा टोला भाजप खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांनीही या प्रकरणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.