शिवसेना ते नवनिर्माण सेना! मनसेप्रमुखांचा असा झाला 'राज'कीय प्रवास... By बाळकृष्ण परब | Published: June 14, 2020 11:29 AM 2020-06-14T11:29:27+5:30 2020-06-14T12:39:37+5:30
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ते स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घेतलेला हा आढावा. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आज जन्मदिन. उत्तम वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व असलेले राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ते स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाविषयी महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे. राज ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाच घेतलेला हा आढावा.
लहानपणापासून बाळासाहेबांशी असलेली जवळीक राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे यांचे पुत्र. श्रीकांत ठाकरे हे प्रख्यात संगीतकार होते. मात्र राज ठाकरेंनी संगीतापेक्षा आपल्या काकांप्रमाणे व्यंगचित्रांची कला आत्मसात केली. त्यांना लहानपणापासूनच बाळासाहेबांचा सहवास लाभला. त्यामुळे बाळासाहेबांच्या सावलीतच त्यांनी राजकीय धडे गिरवले. तसेच आक्रमक नेतृत्व आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे राज हे बाळासाहेबांचे वारसदार समजले गेले.
राज आणि विद्यार्थीसेना राज ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे विद्यार्थीसेनेचे नेतृत्व सोपवले गेले. तसेच त्यांच्या काळात विद्यार्थिीसेनेचा विस्तार होऊन नवे तरुणही शिवसेनेशी जोडले जाऊ लागले.
मायकेल जॅक्सनचा भारत दौरा १९९६ मध्ये प्रख्यात डान्सर मायकेल जॅक्सनने केलेला मुंबईचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. शिव उद्योग सेनेच्या मदतीसाठी मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मायकेल जॅक्सनला भारतात आणण्यामध्ये राज ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वत: राज ठाकरे मायकेल जॅक्सनच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते.
रमेश किणी हत्या प्रकरण आणि राज ठाकरे १९९६ मध्ये झालेल्या रमेश किणी या व्यक्तीच्या हत्येसंदर्भात राज ठाकरेंवरही संशयाचे बोट दाखवले गेले होते. त्यांची चौकशीही झाली. पुढे ते या सर्वातून निर्दोष सुटले. मात्र राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीस या प्रकरणामुळे धक्का बसला.
शिवसेनेचे महाबळेश्वर अधिवेशन २००३ मध्ये झालेले शिवसेनेचे महाबळेश्वर अधिवेशन हे शिवसेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीला कलाटणी देणारे ठरले. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवडण करण्यात आली. उद्धव ठाकरे हेच बाळासाहेब यांचे उत्तराधिकारी असतील, हा तो संकेत होता. त्यानंतर शिवसेनेची सूत्रे हळूहळू उद्धव यांच्याकडे येत गेली.
राज यांची शिवसेनेतील घुसमट महाबळेश्वर अधिवेशनानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये फारसे स्थान मिळेनासे झाले. त्यातच २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे समर्थक असलेल्या अनेकांची तिकिटे कापली गेल्याची चर्चा झाली. त्यामुळे राज यांची पक्षात मोठ्या प्रमाणात घुसमट होऊ लागली.
शिवसेनेला सोडचिठ्ठी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी एक व्यापक महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर मला स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, असे सांगत २००६ मध्ये ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मनसेसोबत येऊ लागला.
मनसेची स्थापना शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी एक व्यापक महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर मला स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, असे सांगत २००६ मध्ये ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मनसेसोबत येऊ लागला.
परप्रांतीयांचा मुद्दा मनसेच्या स्थापनेनंतर २००७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र मनसे खऱ्या रूपाने चर्चेत आली ती २००८ मध्ये मराठीचा मुद्दा घेऊन सुरू केलेल्या आंदोलनानंतर या आंदोलनादरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी परप्रांतीयांना लक्ष्य करण्यात आले. त्यातून राज यांना अटकही झाली. मात्र शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा खेचून आणण्यात राज आणि मनसे यशस्वी झाली.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील यश २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणुकीत उतरली. मात्र तरीही राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. तर मनसेमुळे शिवसेना-भाजपा युतीचे अनेक ठिकाणी जबर नुकसान झाले.
महानगरपालिका निवडणुकीत इंजिन सुसाट विधानसभेतील या यशानंतर मनसेचे इंजिन सुसाट सुटले. २०१० ते २०१२ दरम्यान विविध नगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसेला लक्षणीय यश मिळाले. नाशिकमध्ये तर मनसेचा महापौरही विराजमान झाला.
नरेंद्र मोदींचे कौतुक आणि गुजरात दौरा याच काळात राष्ट्रीय पटलावर नरेंद्र मोदींचा उदय होत होता. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. तसेच त्यांच्या गुजरात मॉडेलचा आढावा घेण्यासाठी २०११ मध्ये गुजरातचा दौराही केला. या दौऱ्याची माध्यमांमध्ये खूप चर्चाही झाली.
आझाद मैदान दंगलीनंतरचा मोर्चा ऑगस्ट २०१२ मध्ये आझाद मैदान येथे रझा अकादमीने केलेल्या आंदोलनानंतर मोठी दंगल उसळली होती. यात अनेक पोलीस जखमी झाले होते. तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता.
बाळासाहेबांचे निधन आणि ऐक्याच्या चर्चा १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्यानंतर राज ठाकरे त्यांची विचारपूस करण्यासाठी वारंवार मातोश्रीवर जात होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर राज-उद्धव आणि शिवसेना-मनसे ऐक्याच्या चर्चांना जोर आला. पण तसे काही झाले नाही.
२०१४ च्या निवडणुकीत अपयश २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र काही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात राज यांनी उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत मुख्य लढत झाली. त्यात मनसेचे मोठे नुकसान झाले. तसेच मनसेचा केवळ एक उमेदवार निवडून आला.
पक्षाला घसरण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची घसरण सुरू झाली. आधी जिथे जिथे यश मिळाले होते. तिथे पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. विशेषत: कल्याण डोंबिवली, नाशिक, मुंबई आणि पुणे महानगरपालिकेत मनसेचे मोठे नुकसान झाले.
मोदी-शहांविरोधात आघाडी यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला राज ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. तसेच पुढे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आघाडीच उघडली. तसेच या काळात राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांनी भाजपाला बेजार करून सोडले होते.
२०१९ मध्ये पुन्हा दारुण पराभव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते. मात्र लाव रे तो व्हिडीओ चा नारा देत राज ठाकरे यांनी मोदी आणि शहांविरोधात जोरदार प्रचार केला. राज ठाकरे यांच्या या पुराव्यानिशी आरोप करणाऱ्या प्रचाराची फार चर्चा झाली. मात्र त्याचे भाजपा आणि मोदीविरोधातील जनमतात परिवर्तन होऊ शकले नाही. पुढे विधानसभा निवडणुकीतही मनसेला काही यश मिळाले नाही. यावेळीही मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला.
हिंदुत्ववादी भूमिकेकडे कल मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे १८० च्या कोनात बदलली. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा करत भाजपाची साथ सोडली आणि थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी केली. त्यामुळे निर्माण झालेल्या एका पोकळीत स्थान मिळवण्यासाठी मनसेने आपली राजकीय फेरमांडणी हाती घेतली. पक्षाचा ध्वज बदलण्याबरोबरच सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देत मनसेने मुंबईत पुन्हा एक महामोर्चा काढला.
भवितव्य राज ठाकरे यांच्याकडे करिश्माई नेतृत्व आहे. लोकांना आकर्षित करणारे प्रभावी वक्तृत्वही आहे. मात्र मनसेच्या राजकीय कार्यक्रमात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप नेहमी होतो. तसेच पक्षबांधणीकडेही पक्षनेतृत्वाने अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आता वरील दोन दोष दूर केल्यास मनसेला पुन्हा एकदा उभारी मिळू शकते. शेवटी राजकारणात काहीच अशक्य नसते.