Shivrajyabhishek Chhatrapati shivaji maharaj Coronation story
आजच्याच दिवशी झाला होता शिवरायांचा राज्याभिषेक; मुंज-लग्नासह नऊ दिवस सुरू होता सोहळा! By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:20 AM2020-06-06T11:20:01+5:302020-06-06T11:52:48+5:30Join usJoin usNext आज शिवराज्याभिषेक दिवस. आजच्याच दिवशी १६७४ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल ९ दिवस सुरू होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान. शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून आजचाचा दिवस महत्त्वाचा. जाणून घेऊया नेमका कसा पार पडला शिवरायांचा राज्याभिषेक... छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक विधीसाठी गागाभट्टांनी स्वतः एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला होता. या ग्रंथाचं नाव होतं 'राज्याभिषेकप्रयोग'. राज्याभिषेक विधी कसा करायचा, कोणकोणते धार्मिक संस्कार आणि समारंभ करावयाचे, याची तपशीलवार माहिती गागाभट्टांनी अभ्यासली होती. त्यानुसारच आता धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता. पहिला विधी महाराजांचे मौंजी बंधन! महाराजांची मुंज व्हायची राहिली होती. मौंजीचे जसे ब्राह्मणांमध्ये महत्त्व तसेच आणि तेवढेच ते क्षत्रियांमध्येही होते. म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज करण्यात आली. मौंजीच्या वेळी महाराजांचे वय 44 वर्ष होते. तेव्हा छत्रपती शिवरायांना सहा मुली आणि दोन मुलं होती. गागाभट्ट आणि बाळंभट्ट यांनी सर्व पौरोहित्य केले. महाराजांची मुंज २९ मे १६७४ रोजी पार पडली. मुंजीनंतर विवाह करावयाचा असतो. त्यामुळे गागाभट्टांनी शास्त्राप्रमाणे शिवरायांना लग्न करण्याची आज्ञा केली. यानंतर मुंजीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० मे १६७४ रोजी सोयराबाई यांचा महाराजांशी पुन्हा समंत्रक विवाह पार पडला. यानंतर सकवारबाई आणि पुतळाबाई यांचीही महाराजांशी पुन्हा लग्ने लागले. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी साधारणपणे रोज एक-एक विधी होत होते, असे वर्णन आहे. पहिले दोन विधी झाल्यानंतर, ऋत्विजवर्णन-पुण्याहवाचनपूर्वक यज्ञाला सुरुवात करून विनायकशांती करण्यात आली. तसेच नक्षत्रशांती, ग्रहशांती एंद्रियशांती आणि पौरंदरीशांती, असे विधी पार पडले. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला महाराजांची सुवर्णतुळा आणि इतर अनेक प्रकारच्या तुळा करायचे ठरले होते. सोळा महादानांपैकी तुळादान किंवा तुलादान हे एक मानले जाते. याच दिवशी महाराजांची सुवर्ण तुळा करण्यात आली. यासाठी तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले होते. तर दुसऱ्या पारड्यात सोन्याचे होन टाकण्यात येत होते. तुळा झाली. यासाठी एकूण १७ हजार होन लागले. म्हणजेच महाराजांचे वजनही पक्के दोणन मण (१६० पौंड) एवढे होते. सोन्याशिवाय चांदी, तांबे, कापूर, साखर, लोणी, फळे आणि मसाले अशा अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली आणि ते दान करण्यात आले. ६ जून (शनिवार) पहाटे शिवरायांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त ठरला होता. बाळंभट्टांच्या पौरोहित्याखाली शिवरायांनी कुलदेवतांची पूजा केली. तसेच, कुलगुरू म्हणून बाळंभट्टांचीही पाद्यपूजा झाली. यानंतर शिवरायांनी वस्त्रभूषणे धारण केल्यानंतर आपल्या ढाल-तलवारींची आणि धनुष्यबाणांची पूजा केली आणि ती सर्व शस्त्रे धारण केली. सर्व शस्त्रे धारण केल्यानतंर महाराज, राणीसाहेब आणि राजपुत्राने कुलदेवतांना, आईसाहेबांना, बाळंभट्टांना, गागाभट्टांना, ब्रह्मवृंदांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला. यानंतर कोदंडधारी महाराज राजसभेकडे निघाले. सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी, अष्टप्रधान आणि चिटणीस यांच्यासह महाराजांनी राजसभेत प्रवेश केला. गागाभट्टा आणि इतर पंडित मोठ-मोठ्या आवाजात वेदमंत्र म्हणत होते. त्या प्रचंड वेद घोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर स्थानापन्न झाले! आणि तोफा व बंदुकांनी दाही दिशा एकदम दणाणून सोडल्या. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे रायगडावर जणू दसरा आणि दिवाळीच अवतरली होती. (संदर्भ - राजा शिवछत्रपति, लेखक - बाबासाहेब पुरंदरे)टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजरायगडमहाराष्ट्रभारतहिंदूShivaji MaharajRaigadMaharashtraIndiaHindu