एसटी कर्मचाऱ्यांना धक्का; संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दल कठोर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:39 IST2025-01-31T13:32:43+5:302025-01-31T13:39:06+5:30
ST Bus News: याबाबतचे निर्णय महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संसाधन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी २०१८ मध्ये त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप केला होता.
या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या गैरहजेरीपोटी तीन दिवसांचे वेतन गमवावे लागण्याची शक्यता आहे.
या संदर्भातील निर्देश एसटी महामंडळाच्या उपव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले असल्याची माहिती गुरुवारी प्राप्त झाली.
मुंबई औद्योगिक न्यायालयाने एसटीच्या संपासंदर्भात २०१८ मधील एका प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार ८ जून २०१८ ते ९ जून २०१८ रोजीच्या संपात सहभाग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून त्यांच्या दिवसाच्या गैरहजेरीकरिता दोन दिवस याप्रमाणे कपात करण्याच्या सूचना महामंडळाकडून प्रसारित करण्यात आल्या आहेत.
आता या संदर्भात अंशतः बदल करण्यात आला असून संपात सहभागी कर्मचाऱ्यांना ‘ना काम, ना दाम’ या तत्त्वानुसार संपात सहभागी दिवसाचे वेतन देऊ नये. तसेच या संपात सहभागी असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त २ दिवसांची कपात करावी, असे निर्देश महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संसाधन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
या निर्देशानुसार संपात एक दिवस सहभाग असल्यास तीन दिवसांची, तर दोन दिवस सहभाग असल्यास चार दिवसांच्या वेतनाची कपात करण्यात येणार आहे.
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून गैरहजेरीच्या एका दिवसाशिवाय अतिरिक्त दोन दिवसांचे वेतन कपात करण्याचे निर्देश विभाग नियंत्रकांना देण्यात आले असतानाच त्या विभागांनी यापूर्वी संप काळातील गैरहजेरीबाबत अतिरिक्त रक्कम वसूल केली आहे. ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना परत करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.