ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १२ - सध्या 'सैराट' या चित्रपटाने लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं आहे. फ्रेश चेहरे, उत्तम अभिनय आणि समधुर संगीत यामुळे या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच सर्वांच्या मनावर राज्य करत कोट्यावधींची कमाईही केली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरू हिचे खूप कौतुक झाले आणि तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तिच्याबद्दल अनेक बातम्यामंधून माहिती मिळालीच आहे, पण चित्रपटाचा देखणा, मोहक हास्य असलेला हिरो परशा अर्थात आकाश ठोसर याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुमच्यासाठी.... > आकाश ठोसर हा मूळचा पुण्याचा. या चित्रपटाचा नायक शोधण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरले, अखेर पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेल्या आकाशच्या रुपाने त्यांना हा नायक मिळाला. > २४ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेल्या आकाश सध्या आता २३ वर्षांचा आहे. तो औंधमधील एसएसव्हीएम शाळेत व त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्याने काही नाटकातही काम केले होते. > आकाश हा एक चांगला कुस्तीपटू असल्याने त्याची शरीरयष्टीही तशीच दणकट होती. मात्र या चित्रपटातील कॉलेजवयीन मुलाची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळेने आकाशला वजन कमी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने महिन्याभरात १३ किलो वजन कमी केले. > झिंगाट गाण्यावरील जोशपूर्ण नाचाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याबद्दल आकाश सांगतो, ‘हा खरं तर फुलआॅन गणपती डान्स; पण तो नागराज मंजुळे यांनी जोशपूर्ण करून घेतला आहे.‘‘झिंगाटच्या वेळी शूट करताना माझे मित्र मला ड्रिंक केलंय का, हेदेखील विचारायचे. पण ते गाणंच असं असल्यामुळे आम्ही फुलऑन गणपती डान्स केला.' > आकाशबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्यामुळे त्याचे विकिपिडिया पेजही तयार करण्यात आले आहे. > आकाशला नाना पाटेकर आणि अंकुश चौधरी हे दोन्ही अभिनेते खूप आवडतात.