विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:21 PM2024-08-29T12:21:23+5:302024-08-29T12:28:02+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधला जाणार आहे.

त्यातून कार्यकर्त्यांची नाराजी, जागावाटपाबाबत असलेली चिंता यासारख्या विविध समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत २४० जागांपर्यंत घसरण झाली आहे. इतर पक्षातून येणाऱ्या उमेदवारी देणे यासह अनेक मुद्द्यांवर कार्यकर्त्यांमधील असंतोष हेही यामागचं कारण असल्याचं बोललं जाते.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी २८ जागा भाजपानं लढवल्या परंतु अवघ्या ९ जागांवरच भाजपाचा विजय झाला तर विरोधकांच्या महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळवला. राज्यातील या पराभवाची कारणमीमांसा करण्यात येत आहे. त्यात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाढतं अंतर हे प्रत्यक्षात मैदानावर प्रचार करणे, मतदारांपर्यंत पोहचणे हे जबाबदार असल्याचं समोर आले आहे.

इतकेच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांमुळे जागावाटप कसं होईल, उमेदवारी कुणाला दिली जाईल याचीही चिंता कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात राज्यभरात फिरून पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत असं पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितले. हिंदुस्तान टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची टीम तयार केली आहे. ही टीम सप्टेंबर ५ पर्यंत किमान ९ ते १० विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहे.

प्रत्येक टीम त्यांचा रिपोर्ट पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय संयुक्त संघटना सचिव शिवप्रकाश यांना सोपवणार आहे. ज्येष्ठ नेत्यांची टीम राज्यभरात जाणार असून त्यात विनोद तावडे यांना पश्चिम महाराष्ट्र तर आशिष शेलारांना कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात हे नेते कार्यकर्त्यांच्या तक्रारी, स्थानिक समस्या जाणून घेतील. त्याशिवाय विरोधी पक्षाकडून होणाऱ्या नॅरेटिव्हचा आणि सोशल मीडियावर त्यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास करतील असंही एका नेत्याने सांगितले.

महाविकास आघाडीकडून सातत्याने महायुतीविरोधात आंदोलन पुकारण्यात येत आहे. त्यात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे, बदलापूर येथील लैंगिक अत्याचार, सरकारकडून विविध प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार हे सर्व मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात येत आहेत. त्यातच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, जातीय विभागणी, आरक्षण आंदोलन या सर्व गोष्टी चिंतेच्या विषय असल्याचं भाजपा कार्यकर्त्यांना वाटतं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह अतुल लिमये यांची महाराष्ट्रात राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपाही आपल्या वैचारिक विचारांवर काम करत आहे.राष्ट्रवादी अजित पवारांशी युती करण्यास इच्छुक नसलेल्या पक्षातील काही लोकांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी संघ नेतृत्वाकडे संपर्क साधला होता हेही बोललं जात आहे.

दरम्यान, निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले हे इतर पक्षातून येणाऱ्यांना उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेवरही नाराज आहेत.पक्षातील उमेदवारांना संधी न देणे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याचंही एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.