Mumbai Local Train: लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये मिळणार प्रवेश? BMC चा सूचक इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:25 PM 2021-07-09T22:25:14+5:30 2021-07-09T22:30:28+5:30
Mumbai Local Train: ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांच्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला बसल्याचे पाहायला मिळाले. आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात देशभरात विविध आघाड्यांवर पावले उचलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासन आतापासूनच आवश्यकती पावले उचलत आहे. ही लाट आलीच तर त्याचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
मुंबईत सध्या जे निर्बंध लागू आहेत त्यात शिथिलता देण्याबाबतही पालिकेने सावधपणाने पावले टाकायचे ठरवले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली. तसेच लोकल सर्वांसाठी केव्हा खुली होणार यावरही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुंबईत ५० टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी ' कोविड प्रतिबंधक लस 'चा पहिला डोस घेतला आहे तर १५ टक्केपेक्षा जास्त नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यात ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांच्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे.
या सवलती नेमक्या कोणत्या असतील याबाबत अंतिम निर्णय येत्या आठ दिवसांत घेतला जाईल, असे काकाणी यांनी सांगितले. तसेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळणार का, यावर काकाणी यांनी सूचक विधान केले. (Mumbai Local Train)
लोकलबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. लोकलवर निर्बंध लावताना वा ते शिथील करताना मुंबईसोबतच मुंबई महानगर प्रदेशाचाही विचार करावा लागतो. या संपूर्ण भागात कोरोनाची स्थिती काय आहे, ते पाहून निर्णय घेतला जात असतो.
हा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारच्या स्तरावरचा आहे. आमच्याकडून केवळ कोरोनाची आकडेवारी आणि अन्य माहिती सरकारकडे पाठवत असतो, असे काकाणी यांनी यावेळी सांगितले.
तसेच कोरोनाची तिसरी लाट येईल हे गृहित धरून पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईत कोरोना साथीच्या अनुषंगाने ज्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत, त्या सक्षम केल्या जात आहेत. त्यासोबत नव्यानेही सुविधा उभ्या करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेल असे केंद्राने सांगितले आहे. ही दिलासा देणारी बाब असली, तरी रुग्णसंख्या वाढल्यास कुठेही पालिकेची यंत्रणा कमी पडू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही काकाणी यांनी नमूद केले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत केवळ ६०० नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच रुग्णदुपटीचा कालावधी ८९२ दिवसांवर गेला आहे.