Thackeray government might ease lockdown restrictions health minister rajesh tope gave indications
लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:28 PM2021-07-29T13:28:12+5:302021-07-29T13:31:36+5:30Join usJoin usNext राज्यातील लॉकडाऊनबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. बहुतांश जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. राज्यातील बहुतांश भागांत निर्बंध लागू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार सावध पावलं टाकत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याचे संकेत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिले आहेत. राज्याचं अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी शिथिलता गरजेची असल्याचं अतिशय महत्त्वाचं विधान आरोग्यमंत्री टोपेंनी टास्क फोर्सची बैठक सुरू होण्यापूर्वी केलं. बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. टास्क फोर्सच्या बैठकीत कोणकोणते निर्णय होऊ शकतात याबद्दचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले. लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरते आहे. याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी द्या असा एक मतप्रवाह आहे. तर ऑगस्टपर्यंत वाट पाहून निर्णय घ्यावा असा दुसरा मतप्रवाह असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरू केल्यास त्यासाठी एक यंत्रणा लागेल. दोन डोस घेतलेल्यांना कशाप्रकारे मॉनिटर करायचं हा प्रश्न आहे. त्यासाठी रेल्वेशी चर्चा करावी लागेल, असं टोपे म्हणाले. सध्या अनेक भागांत दुकानं ४ वाजता बंद होतात. ही वेळ वाढवली जाऊ शकते. काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढ अतिशय कमी आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. तिथले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले. काही जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार दुकानं सुरू असतात. शनिवारी, रविवारी सर्व दुकानं बंद असतात. अशा भागांत परिस्थिती नियंत्रणात असल्यास शनिवारीही दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते असं टोपे म्हणाले. आता बऱ्याच ठिकाणी कार्यालयं सुरू होत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होमदेखील शक्य आहे. अशा ठिकाणी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची परवानगी देता येऊ शकेल. दोन डोस घेतले असल्यास त्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची परवानगी देता येऊ शकेल, असे संकेत टोपेंनी दिले. सलून, पार्लर, हॉटेल, रेस्टॉरंटसाठी लागू असलेले निर्बंधदेखील शिथील केले जाऊ शकतात. मात्र अशा ठिकाणी एसी चालू नसावा. तिथे हवा खेळती राहायला हवी, असं टोपे म्हणाले. तिसऱ्या लाटेचा धोका कामय असल्यानं राज्यातील बऱ्याचशा भागांत सध्या निर्बंध लागू आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं ठाकरे सरकार बरेच निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा अपेक्षित आहे.टॅग्स :राजेश टोपेउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसRajesh TopeUddhav Thackeraycorona virusCorona vaccine