एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:17 PM 2022-10-10T16:17:32+5:30 2022-10-10T16:19:48+5:30
शिवसेनेतील शिंदे-ठाकरे अंतर्गत वादामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरू नका असं सांगत नाव चिन्ह गोठवण्याचं निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला पसंतीची नावे, चिन्ह देण्यासाठी ३ पर्याय दिले होते.
उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल यापैकी एका चिन्हाची मागणी करण्यात आली त्याचसोबत शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे या तीन नावांचा पर्याय देण्यात आला.
ठाकरे गटाकडून नाव आणि चिन्हाची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाकडून पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या पसंतीच्या ३ चिन्हाचा पर्याय देण्यात आला. त्यात त्रिशूळ, उगवता सूर्य शिंदे-ठाकरे गटाकडून सारखेच मागण्यात आले.
इतकेच नाही तर शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या ३ नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना बाळासाहेब हे शिंदे-ठाकरे गटासाठी केंद्रबिंदू असून आता निवडणूक आयोग यावर कुठला निर्णय देते हे पाहणे गरजेचे आहे.
ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल आणि शिंदे गटाला गदा चिन्ह मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण त्रिशूल आणि उगवता सूर्य ही मागणी दोन्ही गटाने केल्याने ही चिन्ह निवडणूक आयोगाकडून वगळण्यात येतील असं बोललं जात आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेऊन शिवसेनेवर अन्याय केला आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाईंनी याचिका दाखल केली आहे. पुरेसा अवधी न देता निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याचं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
तर शिवसेनेच्या बाबतीत खरंतर त्यांनी जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ निवडणूक आयोगानं दिला होता. आधी दोन आठवडे मागितले, मग चार आठवडे मागितले. निवडणूक आयोगानं हवा तितका वेळ दिला. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. स्वायत्त संस्थांवर आरोप करुन त्यांना कमकुवत करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर केला