महाराष्ट्रातील 'महाविजया'नंतर आलेल्या ताज्या सर्व्हेनं भाजपाचं वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:35 IST2025-01-21T19:31:55+5:302025-01-21T19:35:28+5:30

महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. सध्या राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर गेलेत तर राज्यात भाजपा संघटन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहे.
अलीकडेच झालेल्या २ दिवसीय शिर्डी अधिवेशनात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे.
येत्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आपापली रणनीती बनवण्याची तयारी आहे. त्यात भाजपाने सर्व्हेच्या माध्यमातून सध्याचे विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधींबाबत जनतेची मते काय हे जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात नागपूरच्या पहिल्या सर्व्हेत अनेक नगरसेवकांबाबत निगेटिव्ह रिपोर्ट समोर आला आहे.
अशा परिस्थितीत पक्ष नवीन चेहऱ्यांना मैदानात उतरवून आणि गुजरात फॉर्म्युला वापरून पाहू शकतो, कारण शिर्डी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपला महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकीत मोठ्या विजयाचे लक्ष्य दिले आहे.
नुकतेच भाजपाने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिला सर्वेक्षण केला होता. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात भाजपाच्या विद्यमान ३० ते ४० टक्के नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक आहे.
निगेटिव्ह कामगिरी असणाऱ्या नगरसेवकांचा भाजपा पत्ता कट करू शकते. ज्यामुळे अनेक भाजपा संभाव्य उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
निवडणुकीसाठी चेहरे ठरवण्यापूर्वी भाजपा दोन ते तीन सर्वेक्षणे करणार आहे. यानंतर, निवडणूक कोण लढवेल? हे तीन उमेदवारांच्या पॅनेलद्वारे ठरवले जाते. नागपूरमधील विद्यमान महापौर आणि नगरपालिका सेवकांचा कार्यकाळ खूप पूर्वीच संपला आहे. सध्या महापालिका कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालवला जात आहे.
नागपूर महानगरपालिकेत एकूण जागांची संख्या १५१ आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने चमकदार कामगिरी करत १०८ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या जागा ४६ ने वाढल्या होत्या. काँग्रेसला २९, बसपाला १० आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी आणि अपक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली.
मुंबईनंतर ठाणे, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे असल्याने भाजपाला नागपूर देखील महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर हे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होम ग्राऊंड नागपूर आहे.
देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे महापौर आणि नगरसेवक राहिले आहेत. पहिल्या सर्वेक्षणात नगरसेवकांचा नकारात्मक अहवाल आल्यानंतर नागपूर फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाल्याची चर्चा आहे. भाजपानं यंदाच्या निवडणुकीत १५० पैकी १३० जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवले आहे.