महाराष्ट्रासह देशावर ४० वर्षातील सर्वात मोठं संकट; राज्य अंधारात जाणार?, उच्चस्तरीय बैठक बोलावली By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:39 AM 2021-10-06T07:39:18+5:30 2021-10-06T07:55:11+5:30
कोळसा संकटावर संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरात मंथन होणार आहे. (माहिती- कमल शर्मा) महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. देशातील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये सरासरी चार दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती आणखी गंभीर आहे.
या कोळसा संकटावर मंथनासाठी संसदीय सल्लागार समितीची उच्चस्तरीय बैठक २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय कोळसामंत्री, राज्यमंत्री, दोन डझनांहून अधिक खासदार, कोळसा सचिव, कोल इंडिया व कोळसा कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक अगोदर १८ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु कोळसा संकट पाहता आता ती २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यादरम्यान झारिया आराखड्यावर चर्चा होईल. यावेळी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करू, असे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केले.
वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. अनेक युनिट ठप्प आहेत. स्टील व ॲल्युमिनियम उद्योगांचा कोळसा वीज केंद्रांना देण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश ओपन कास्ट कोळसा खाणींत पाणी भरले असून, उत्पादनाला फटका बसला आहे.
देशाच्या काही वितरण कंपन्यांनी पॉवर एक्स्चेंजकडून महाग वीज खरेदीचे कारण देत वीज दरांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात तर स्थिती आणखी गंभीर आहे. कोराडीत कोळसा वाहतुकीत झालेल्या गडबडीमुळे व्यवस्थापनाचा ताण वाढला आहे.
प्रकल्पांमध्ये दोन दिवसांचाच कोळसासाठा (१ लाख ४० हजार टन) शिल्लक आहे. पारस व भुसावळमध्ये केवळ अर्ध्या दिवसाचाच कोळसा आहे. अशात वाहतुकीची समस्या झाली, तर प्रकल्प बंद होईल. सध्या राज्यात लोडशेडिंग नाही. परंतु जर स्थितीत सुधारणा झाली नाही, तर लोडशेडिंग होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.
कोरोनातून थोडी उसंत मिळत असताना जागतिक अर्थव्यवस्थेपुढे अनेक नवनवी संकटे उभी ठाकत आहेत. ब्रिटनमध्ये इंधनाची तर चीन-युरोपात विजेची तीव्र टंचाइ निर्माण झाली आहे. भारतातही कोळशाच्या अभावी वीजनिर्मात्या कंपन्यांचे उत्पादन कमी होऊ लागले आहे
देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोळशाच्या किमती विक्रमी स्तरावर आहेत. देशांतर्गत कोळशाच्या किमती कमी आहेत. किमतीतील या तफावतीमुळे कोळशावर आधारित वीजकंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
चीनमध्ये सध्या कोळशाच्या खाणींच्या स्थितीचा आढावा घेतला जात असल्याने तेथे उत्पादन घटले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे चीनमध्येही वीजनिर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे तिथे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये आता स्थानिक थर्मल कोळशाला महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.