ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३० : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. यात सहभागी झालेल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची हमखास चर्चा होणार हे ठरलेलं आहे. या कार्यक्रमाची हीच लोकप्रियता बघून यात आता बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत.आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवुडचा भाईजान आणि दबंग खान अशी ओळख असलेला सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ४ आणि ५ जुलैला रात्री ९.३० वा. सलमान खान सोबत थुकरटवाडीतील मंडळींनी केलेली धम्माल बघायला मिळणार आहे.थुकरटवाडीकरांचा मैने ट्राय कियाकार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकप्रिय कलाकारांच्या एखाद्या गाजलेल्या कलाकृतीवर आपला वेगळा चित्रपट काढण्याची हौस थुकरटवाडीतील मंडळींना आहे. सलमान खानने ज्या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं होतं तो चित्रपट म्हणजे मैने प्यार किया. याच चित्रपटावर आधारित मैने ट्राय किया हे धम्माल स्किट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ज्यात प्रेमची भूमिका साकारलीये भाऊ कदमने तर सुमनची भूमिका केलीये श्रेया बुगडेने. आपल्या चित्रपटाचं हे नवं रूप बघून सलमानचीही हसून हसून पुरेवाट लागली.बाप की अदालत मध्ये सलमानवर आरोपथुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.सलमान आणि सुलतानसुलतानच्या सेटवरच्या अनेक मजेदार आठवणी सलमानने यावेळी सांगितल्या. या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत,त्या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि सध्या देशात असलेल्या कुस्ती या खेळाबद्दलच्या परिस्थितीतीवरही तो भरभरून बोलला.मराठमोळा सलमानया कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. सलमानला सर्व मराठी नीट कळतं आणि आपल्या घरातही आई आणि तिचे नातेवाईक कसे मराठी बोलतात याबद्दलचे धम्माल किस्सेही सलमानने यावेळी सांगितले. यावेळी कलाकारांच्या विनंतीवरून सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.बॉलिवुडसाठी दबंग असणा-या या सुपरस्टारचं हे मराठमोळं रूप बघायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. येत्या सोमवार आणि मंगळवारी चला हवा येऊ द्या चे हे दोन्ही भाग रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.