मुंबई : मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात ठाणे आणि कल्याण स्थानकांत सर्वाधिक अनुक्रमे १२९ व ११७ जणांचा मृत्यू झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यानंतर उपनगरातील गोरेगाव, बोरीवली, विरार, मानखुर्द या स्थानकांत व त्यादरम्यान मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले.रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात होतात. त्यानंतर ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे, नैसर्गिक मृत्यू व अन्य अपघात रेल्वे स्थानक व हद्दीत होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागताना काही गंभीर जखमीही होतात. २0१६मध्ये अशा प्रकारे झालेल्या विविध अपघातांमध्ये मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर झालेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनच्या ठाणे ते कल्याण या पट्ट्यात ४७८ जणांचे मृत्यू झाले असून, यामध्ये ठाण्यात सर्वाधिक १२९ जणांचा मृत्यू आणि ७१ जण जखमी, तसेच कल्याण स्थानकात ११७ जणांचा मृत्यू तर १४७ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दिवा स्थानकात तर ७१ जणांनी विविध अपघातांत प्राण गमावले आहेत. (प्रतिनिधी)