ठाकरे आणि पवारांमधील समन्वय कसा साधला जातो? राजेश टोपेंनी थेट उदाहरणच दिलं... By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:49 PM 2022-01-06T16:49:39+5:30 2022-01-06T17:00:46+5:30
महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. पण आज शरद पवार, उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना समन्वयाच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांनी एक उदाहरणच दिलं. जाणून घेऊयात.... राज्यातील कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra Corona Updates) झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसंच शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायासंदर्भात काही सूचना सरकारला यावेळी केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबईत झालेली बैठक संपल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सध्याची परिस्थिती, त्यावरचा उपाय आणि निर्बंधाच्या निर्णयाची अंमलबजावणी होतेय का? होत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल? अशा मुद्द्यांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला, असं राजेश टोपे म्हणाले.
ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो त्या गोष्टींवर आधीच निर्बंध आहेत. मात्र अजूनही ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवेत येत नाहीत आणि तिथं आजही गर्दी होत असेल तर त्यासाठी आणखी काही कडक निर्बंध लावता येतील का याबाबतच्या सूचना शरद पवार यांनी दिल्याचं राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार रोज संपर्कात "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दररोज चर्चा करतातच. रोज सकाळी ७ वाजता त्यांची एकमेकांशी फोनवर सविस्तर चर्चा असतेच. निर्णय घेण्यासाठी आणखी काही सोपं होऊ शकतं यादृष्टीकोनातून त्यांनी फक्त आढावा बैठक घेऊन आज त्यांनी माहिती जाणून घेतली", असं राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. त्यात राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्य वाऱ्यावर असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आरोपांना खोडून काढताना टोपे यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांचं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून दोघांमध्ये दैनंदिन पातळीवर चर्चा होत असते अशी माहिती यावेळी दिली.
"मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी आज फक्त अधिकची माहिती घेतली. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैठक घेतली होती. त्यातही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आजही काही चर्चा झाली. यानंतर निर्बंधांबाबत मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र त्यांच्या चर्चेतून निर्णय घेतील", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावलं उचलण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. यात लसीकरण कसं वाढेल यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू असं आश्वासन देखील पवारांनी दिलं आहे. अनावश्यक गोष्टींसाठी होणारी गर्दी कशी टाळता येईल याबाबत निर्णय घेण्याच्याही सूचना पवारांनी केल्या आहेत.
मुंबई लोकल बंद करण्याचा विचार नाही मुंबईची लोकल बंद करण्यासंदर्भात आज कोणतीही चर्चा झालेली नाही, असं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यात लॉकडाऊनचा विषय देखील चर्चेत आलेला नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.
शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी शहरांमध्ये हळूहळू महाविद्यालयं बंद होत आहेत. पण शाळा, कॉलेज बंद झाल्यानं मुलं रस्त्यावर, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये फिरी लागली तर शाळा-कॉलेज बंद करण्याचा काहीच अर्थ नाही. त्यामुळे रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आणखी ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे.