Uddhav Thackeray Birthday: संयमी, संवेदनशील राजकारणी ते ठाकरे घराण्याचा पहिला मुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंची वादळी कारकीर्द By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 09:43 AM 2022-07-27T09:43:21+5:30 2022-07-27T09:55:04+5:30
Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभाला असून, या संघर्षाच्या काळात पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. यातच आता पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली असून, प्रचंड सक्रीय झाले आहेत. त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे.
शिवसेनेतील या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या नव्या संघर्षातच उद्धव ठाकरे आपला ६२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. (Uddhav Thackeray Birthday)
कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर 'मातोश्री' निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'बाहेर रांगा लागतात.
उद्धव ठाकरेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली आहे. याचवेळी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव यांच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशीर्वाद दिले होते.
उद्धव ठाकरेंचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्षात झालेला आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी त्यांनी शिक्षण घेतलं असून त्यांच्या छायाचित्रणाची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. २९ जून रोजी बदललेल्या राजकीय स्थितीमुळं त्यांनी तो निर्णय घेतला. आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाची नव्यानं उभारणी करण्याचं आव्हान आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाच्या एका सभागृहाचं सदस्य सहा महिन्याच्या आत होणं आवश्यक असतं. १८ मे २०२० रोजी उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाची मुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली असून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हापासून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम पाहतात.
उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभाला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमातून २००२ च्या मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून दाखवली होती.
२००३ मध्ये त्यांच्याकडे शिवसेनेचे कार्याध्यक्षपद सोपवण्यात आलं. २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उत्तराधिकारी जाहीर केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी करोना संसर्गाच्या काळात केलेल्या कामाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडाळीनंतर अखेर उद्धव ठाकरेंनी २९ जून रोजी मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेची नव्यानं बांधणी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे.
नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
एकीकडे पक्षासाठी पुन्हा मोर्चेबांधणी करत असताना शिंदे गटाला वाढता पाठिंबा उद्धव ठाकरेंसाठी चिंताजनक ठरणारा असून, शिवसेनेतील गळती ते आता कशी थांबवतात, शिवसेनेला पुन्हा सोन्याचे दिवस येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.