राज ठाकरे तेव्हा पात्र होते, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा, उद्धव ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 06:51 PM2024-08-18T18:51:49+5:302024-08-18T18:58:43+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांशी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. त्यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर का पडले याबाबत अनेकदा चर्चा होते. त्यात एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केले आहे.

एएनआयच्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले. शिंदे म्हणाले की, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, उद्धव ठाकरे बोलतात लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ कधी आणणार, आम्ही युवा प्रशिक्षणातून लाडका भाऊही आणला. राज ठाकरे तुमच्यासोबत होते तेव्हा त्यांनी सोडण्यामागचं कारण काय होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे काम करत होते. १९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनीही प्रचार दौरे, सभा केल्या. एकीकडे बाळासाहेब ठाकरे प्रचार करायचे, दुसरीकडे राज ठाकरे करायचे असं वेगळं त्या दोघांनी तयार केले होते अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

त्याशिवाय जेव्हा राज ठाकरेंना जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंची सुप्त इच्छा जागृत झाली. जशी आता मुख्यमंत्रिपदाची होती. शिवसेनेत राज ठाकरेंना बाजूला करण्यात आले. त्यांच्याच तोंडातून बोलायला भाग पाडले. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला गेला आणि राज ठाकरेंना हटवण्यात आले असं शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, पक्षातून हटवल्यानंतरही राज ठाकरेंनी म्हटलं जिथं शिवसेना कमकुवत आहे तिथली जबाबदारी मी घेतो. मात्र असुरक्षित भावना त्यामुळे राज ठाकरेंना तेदेखील दिले नाही. राज ठाकरेंनी पक्षातून जावं ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.

राज ठाकरे आज आमच्यासोबत आहेत. मागील निवडणुकीत ते आमच्या व्यासपीठावर आले होते. आता विधानसभेला ते वेगळे असले तरी आमच्याविरोधात नाही. निवडणुकीला अजून वेळ आहे. पुढे काय होते ते बघू पण राज ठाकरे हे त्यावेळी पदासाठी पात्र होते, त्यांनी तसं काम केले होते असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

तर पक्षाच्या प्रमुखाने कुटुंबाच्या हितापेक्षा पक्षाला महत्त्व दिलं पाहिजे. अलीकडेच उदाहरण आहे, केंद्रीय सत्तेत जेव्हा मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा आमच्या ६ खासदारांनी श्रीकांतला मंत्रिपद द्या मागणी केली परंतु श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद द्यावे. मी पक्षाचं काम करेन असं सांगितले.

माझ्या जागी दुसरं कुणी असते तर त्याने आधी कुटुंबाचा विचार केला असता पण आम्ही हा विचार करत नाही. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपदाची संधी दिली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगोदर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदावर भाष्य केले होते. १९९५ साली सरकार आलं तेव्हा मी राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मला डावलण्यात आले. मंत्रिपदासाठी बाळासाहेब, माँसाहेब तयार होत्या. माझ्यासाठी घरात भांडणं होत असतील तर मी थांबतो असं मी बाळासाहेबांना सांगितले होते असं कदम यांनी दावा केला होता.

निश्चितपणे राज ठाकरे यांच्यावर १०० टक्के अन्याय झालाय. उद्धव ठाकरेंना जेव्हा अध्यक्ष केले तेव्हा राज ठाकरेंना अध्यक्ष केले असते तर निश्चित महाराष्ट्रातील मराठी माणसांना न्याय मिळाला असता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची छबी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जाते. त्यांचे वकृत्व, कतृत्व, त्यांचे बोलणे, चालणे हे सगळे बाळासाहेबांशी जुळते आहे. दुर्देवाने हे घडायला नको होतं, पण ते झाले असंही रामदास कदमांनी म्हटलं होते.