शिवाजी महाराजांबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 10:30 AM2018-02-19T10:30:57+5:302018-02-19T10:39:01+5:30

स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले उत्कष्ट योद्धे तर होतेच पण त्यांच्या स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी प्रवृत्ती यांमुळे त्यांचा आजही त्यांचा तितकाच आदर केला जातो, गौरव करण्यात येतो. जनतेवर अत्याचार करणाऱ्या मुघलांपासून शिवाजी महाराजांनी रयतेची सुटका केली व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आपल्या मावळ्यांसह व शूर पराक्रमींसह त्यांनी स्वराज्य उभं केलं.

१) जन्म - शिवरायांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६३० (फाल्गुन कृष्ण तृतीयेला) पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचं नाव हे शिवशंकरापासून नव्हे तर शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले.

२) मुस्लीम सहकारी - शिवरायांच्या सहकाऱ्यांमध्ये मुस्लिम सहकाऱ्यांचाही मोठा वाटा होता. हिंदू असूनही शिवरायांनी आपल्या दरबारात मुस्लिम सहकाऱ्यांना स्थान दिलं होतं. शिवरायांच्या मते त्यांची लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून त्यांच्या साम्राज्याशी होती.

३) गनिमी कावा - खुप कमी प्रशासकांपैकी शिवाजी महाराज हे असे प्रशासक होते जे गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करायचे. शत्रूविरुद्ध लढण्यासाठी महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांमध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी अनेक शत्रुंशी कमी फौजफाटा असूनही लढा दिला.

४) आरमाराची स्थापना - शत्रू समुद्रमार्गे येऊनही हल्ला करू शकतो हे शिवरायांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी आरमाराची स्थापना केली. 'ज्याचं आरमार, त्याचा समुद्र' असे धोरण असल्याने कोकण किनारपट्टीवर जलदुर्ग उभारून त्यांनी तेथे 'मायनाक भंडारी' समाज असलेल्या आरमाराच्या सुभेदारांकडे जबाबदारी सोपवली. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे त्यांच्या दुरदृष्टीचे प्रतिक आहेत.

५) शिक्षा व कठोर प्रशासन - शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्या व त्यांना त्रास देणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची तजवीज करून ठेवण्यात आली होती. कोणत्याही स्त्रिवर अन्याय झाला आहे हे कळताच त्या व्यक्तीवर कडक शासन करण्यात येई. कोणत्याही साम्राज्यावर आक्रमण करताना तेथील स्त्रिया व लहान मुलांना त्रास होता कामा नये, अशी सक्त ताकिद त्यांच्या सैन्याला देण्यात आली होती.