Vande Bharat Mumbai-Solapur Express Experience: वंदे भारत एकदम हायफाय पण धन्य त्यांचे वायफाय! तिकिटांत भेदभाव... कसा वाटला पुण्यापर्यंत प्रवास...? By हेमंत बावकर | Published: February 20, 2023 02:43 PM 2023-02-20T14:43:14+5:30 2023-02-20T14:56:34+5:30
वंदे भारत, ट्रेन एकच मग एवढा प्रवाशांसोबत एवढा भेदभाव का? अनेकांना तर चुकीचे वाटले. गेल्याच आठवड्यात आम्हीदेखील मुंबई पुणे असा प्रवास केला. वंदे भारत पहिल्यांदाच महाराष्ट्रात धावण्यास सुरुवात होऊन आता दीड आठवडा उलटून गेला आहे. पहिल्या काही दिवसांत हौशी प्रवाशांनी गर्दी केली होती. तेव्हा वंदे भारत एक्स्प्रेसमधील जेवण, नाष्ता आदींची चवही चाखली गेली. ती काही फारशी लोकांना आवडली नाही. अनेकांना तर आपल्यासोबत भेदभाव झाल्याचे दिसून आले. गेल्याच आठवड्यात आम्हीदेखील मुंबई पुणे असा प्रवास केला.
इतर एक्स्प्रेसला एसीचे ३५०-४०० रुपये तिकीट असताना वंदेभारतचे मुंबई पुण्यासाठीचे तिकीट काहींनी ६३०, काहींना ६६० काहींना ६८० असे पडले. एवढा फरक का झाला? वंदेभारत आणि आणि इतर एक्स्प्रेसच्या तिकीट दरात एवढा फरक कशाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एकतर वंदे भारत ही प्रिमिअम ट्रेन आहे. त्यामुळे तिचे तिकीट दर एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी तिकीटापेक्षा साधारण २५०-३०० रुपयांनी जास्त आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ही ट्रेन फास्ट आहे. म्हणजेच दादरहून सव्वाचारला सुटलेली ट्रेन पुण्यात सायंकाळी सातला पोहोचली. म्हणजे इतर ट्रेनपेक्षा सुमारे पाऊन तास लवकर. सध्या ट्रायल सुरु असल्याने त्यानंतर तो वेळही २० मिनिटांनी कमी होणार आहे. मग काय अडीच तासांच मुंबई-पुणे....
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन एकदम सायलंट आहे. आतमध्ये जसे इतर ट्रेनना ट्रॅक आणि चाकांचे धकधक, खाडखाड असे आवाज येतात ते १२३ किमी प्रती तासाच्या स्पीडलाही येत नाहीत. वंदे भारतचा वेग किती आहे, ते तिथे लावलेल्या स्क्रीनवर दिसतो किंवा तुम्ही वंदे भारतच्या वायफायला कनेक्ट करून पाहू शकता.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी किचकिच इतर ट्रेनमध्ये असते, म्हणजे सामान्य तिकीटार प्रवासी घुसतात किंवा गजबजाट करतात त्यापासून सुटका होते. यामुळे जे पैसेवाले थोडे सामान्यांपेक्षा जास्त श्रीमंत लोक आहेत ते या ट्रेनचा पर्याय स्वीकारत आहेत. कारण शिवनेरीने जाण्यापेक्षा या ट्रेनने गेलेले कधीही कमी वेळेचे आणि सोईचे झाले आहे.
या ट्रेनमध्ये तुम्ही तिकीट कशावर काढलेय त्यावर तुम्हाला स्नॅक्स, जेवण येणार की नाही ते ठरते आहे. काहींनी पेटीएम, आयआरसीटीसी आणि अन्य अॅपवर तिकीट बुक केले होते. बहुतांश आयआरसीटीसी वरून बुक करणाऱ्यांना स्नॅक्स मिळाले. परंतू, इतरांनी ज्यांनी अन्य प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक केले त्यांना जास्त पैसे मोजूनही ते मिळाले नाही. काहींना अन्य प्लॅटफॉर्मवर ४० रुपयांची फी जास्त द्यावी लागली. यामुळे मुंबई-पुण्याच्या या लोकांच्या प्रवासात अॅपनुसार दरात फरक दिसून आला.
क्समध्ये सफरचंदाचा प्रीझर्व्हड ज्यूस, बाकरवडी (चितळेंची नाही) त्यावरीलही एक्स्पायरी डेट खोडलेली. गरम पाण्यात मिसळून पिण्यासाठी चहा पावडर, एक बटाटा वडा(पाव नाही) असे देण्यात आले होते. यामध्ये सफरचंदाचा रस काहीसा क़डवट लागत होता. ही कंपनीही सो सोच होती. बाकरवडीचीही क्वालिटी एवढी खास नव्हती. दुसऱ्या एका प्रवाशाला बाकरवडीऐवजी वेगळा आयटम देण्यात आला होता.
रेल नीरच्या पाण्याच्या बाटल्या या फ्री होत्या. कितीही घेतल्या तरी पैसे द्यावे लागत नव्हते. सोलापूरपर्यंत जाणाऱ्यांनी तीन-चार बॉटल घेऊन ठेवल्या होत्या. आधीच प्रत्येकासाठी एकेक पाण्याची बॉटल ठेवण्यात आली होती.
ही प्रिमिअम ट्रेन असल्याने त्याचा प्रवासी वर्ग देखील बराचसा श्रीमंत, इंग्रजी- हिंदी झाडणारा असेल असे रेल्वेला अपेक्षित असावे. यामुळे बहुतेक टीसी इंगजी, हिंदी बोलणारा परंतू मराठी होता. महत्वाचे म्हणजे तो राष्ट्रीय स्तरावर व्हॉलिबॉल खेळलेला खेळाडू, कॅप्टन होता. इतर पँट्रीचे कर्मचारी मात्र नेहमीच्या ट्रेनमध्ये असतात तसेच होते.
वंदे भारत हायफाय पण तिचे वायफाय... वंदे भारत ट्रेन ही वायफाय असलेली आहे. परंतू हे वायफाय म्हणजे इंटरनेट नाही तर त्यांच्याकडील सर्व्हरवरील ट्रेनचा इतिहास, वंदे भारतची माहिती आणि एवढे रटाळ मुव्ही, गाणी, लहान मुलांसाठी कार्टुन की ते कोणी पाहणारही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भागात चालणारी ट्रेन असली तरी त्यामध्ये मराठीचा समावेश नाही. हिंदी, तेलगू, तामिळ, इंग्लिश मुव्ही, गाणी आहेत. ती देखील बाबा आझमच्या काळातील.
रेल्वेला तक्रार किंवा सुचना देण्याची सोय... त्या वायफायवरच एक रेल्वेला जेवण ऑर्डर करण्याची, सफाई, आग लागली, इमरजन्सी स्टॉप, मेडिकल, सुरक्षा आदी मदतीची सोय आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा कोच नंबर, सीट नंबर आणि नाव आदी टाकावे लागणार आहे.
चार्जिंग पॉईंट शोधून सापडणार नाही... मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करायचा असेल तर तुम्हाला चार्जिंग पॉईंट शोधून सापडणार नाही अशा ठिकाणी आहे. तुमच्या सीटच्या खाली तो देण्यात आला आहे. त्याला चार्जर लावणे देखील काहीसे अडचणीचे आहे.
तांत्रिक अडचणी... वंदे भारत एक्स्प्रेस शंभरच्या स्पीडने असतानाही दरवाजे बंद हो रहे है... अशी स्टेशनवरची अनाऊंसमेंट होत होती. ही एक तांत्रिक बाब वगळता वंदे भारतचा प्रवास आम्हाला सुखकर सोईस्कर वाटला. ही ट्रेन तशीच चकचकीत रहावी, तिचा वापर नीट व्हावा, असे या प्रवाशांना वाटत होते.