ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. १८ : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली नंतर नांदेडमध्येही रविवारी निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात शहराच्या चोहोबाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर लाखोंचा जनसागर उसळत आहे़. पहाटेपासूनच रस्त्यांवर ५ हजार स्वंयसेवक गणवेशासह उपस्थित झाले आहेत़ लोहा-नांदेड, नरसी-नायगाव-नांदेड, अर्धापूर-नांदेड, भोकरफाटा-नांदेड, मुदखेड-नांदेड, पूर्णा-नांदेड, वसमत-नांदेड या प्रमुख मार्गांसह शहराला जोडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या रस्त्यांवर सकाळपासूनच गर्दी उसळली आहे़शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहनतळ केलेले आहेत़ तेथून मराठा समाजबांधव नवा मोंढा मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत़ ढवळे कॉर्नर, लातूरफाटा, कापूस संशोधन केंद्र, चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड, एम़जी़एम़ कॉलेज, ग्यानमाता शाळा, नमस्कार चौक, केंद्रीय विद्यालय आदी ठिकाणी वाहने उभी करण्यात आली असून शहरातून जाणाऱ्या मोर्चा मार्गावर लोक पायी येत आहेत़. या मोर्चासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून १५ लाखांवर सकल मराठा समाजबांधव सहभागी होतील असे समाजाच्यावतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते़ दरम्यान जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महापालिकेच्यावतीने स्वच्छतागृह आदी सुविधाही उभारण्यात आल्या आहेत़.सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य चौकांमध्ये मुस्लिमबांधव तसेच इतर समाजाच्या बांधवांनी बाहेर गावाहून येणाऱ्या मोर्चेकरांच्या नाश्ता व चहाची व्यवस्था केली आहे़ सकाळी ९ वाजेपर्यंत बहुतांश लोक मोर्चामार्गावर आलेले दिसत होते़.कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापार थांबवा तसेच त्यात योग्य तो बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या आदी मागण्या मोर्चातील बांधव करीत आहेत़.