ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 15 - ‘एक मराठा - लाख मराठा’ या हाकेला साद कोल्हापूरात निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची यशस्वी सांगता झाली. मोर्चात सहभागी झालेल्या ५ भगिनींनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरच्या सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचा प्रारंभ शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास गांधी मैदान येथून झाला. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्रासह कोकण तसेच कर्नाटक सीमाभागातील मराठा समाजाचे हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. खा.छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री हसन मुश्रीफस सतेज पाटील व राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदि नेते मंडळीही सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चामुळे कोल्हापुरातील रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरही कूच, कोगनोळीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या होत्या. सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. गांधी मैदानमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन व जिजाऊवंदनानंतर मोर्चाची सुरुवात झाली. याच वेळी सकाळी ११ वाजता गांधी मैदानसह ताराराणी चौक, तपोवन मैदान-शेंडा पार्क, कसबा बावडा (पॅव्हेलियन मैदान), शिवाजी विद्यापीठ परिसर येथूनही मोर्चाला प्रारंभ झाला. गांधी मैदान येथून निघणाऱ्या मोर्चात प्रथम १० मुली विशिष्ट गणवेशात अग्रभागी होत्या. त्यापैकी ५ मुलींच्या हाती क्रांतिज्योत होती व त्या १० मुलींच्या भोवती सुरक्षा कडे होते.या मुलींच्या पाठीमागे महिला, महाविद्यालयीन युवक, पुरुष व त्यानंतर राजकीय नेते असा क्रम होता. या चार ठिकाणांहून निघणाऱ्या मोर्चात अग्रभागी असणाऱ्या एकूण २५ हजार युवतींच्या हाती लहान-मोठे, तर सुमारे दोनशे महिलांच्या हाती भव्य मोठे झेंडे लक्ष वेधून घेत होते. १४ स्क्रीनवर थेट प्रक्षेपणसंपूर्ण मोर्चा मार्गावर सूचना देण्यासाठी एफ. एम. यंत्रणा कार्यरत असून मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर १४ भव्य एल. ई. डी. स्क्रीन उभारण्यात येणार आहे. या स्क्रीनवर मोर्चाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. शिवाय दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत सुमारे २०० ध्वनिक्षेपक लावण्यात येणार आहेत. भाषण, निवेदन वाचनासाठी युवतीदसरा चौकात दुपारी एक वाजता एक युवती भाषण, एक युवती निवेदन वाचन, एक युवती राष्ट्रगीत म्हणणार, तसेच आणखी दोन युवती जादा उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, पाच युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. या युवतींची नावे गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत. मोर्चामागे राजकीय नेतेगांधी मैदान येथून निघणाऱ्या मोर्चाच्या सर्वांत मागे राजकीय व्यक्ती राहणार आहेत; तर सर्व खासदार, आमदार व आणखी राजकीय नेते हे मोर्चाच्या शेवटी वृषाली हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत येतील. महामार्गावर दिशादर्शक नकाशेराष्ट्रीय महामार्गावरून प्रामुख्याने नागरिकांची गर्दी शहरात येणार असल्याने महामार्गावर सांगली फाटा, गोकुळ शिरगावनजीक मावळे वाहनांसाठी दिशादर्शक नकाशे व फलक उभे करणार आहेत. सोनतळी ते शिवाजी पूल केएमटी सेवाशहरापासून किमान चार किलोमीटर अंतरावर सोनतळी येथे वाहन पार्किंग व्यवस्था असल्याने तेथे पार्किंग केलेल्या नागरिकांसाठी शिवाजी पुलापर्यंत नेण्यासाठी १५ केएमटी बसेसची सोय करण्यात आली आहे. याशिवाय पार्किंगच्या ३७ ठिकाणी ‘केएमटी’च्या २०० अधिकाऱ्यांसह, वाहतूक शाखेचे सुमारे २०० पोलिस कार्यरत राहणार आहेत. मुस्लिम बांधवांचे मोलाचे सहकार्यसामाजिक समतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या गेलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चात प्रत्येकजण आपला सहभाग नोंदवत आहेत. विविध जाती-धर्माचे लोक मोर्चाला सहकार्य करत असल्याचे चित्र आहे. मुस्लिम समाज तर या सगळ्यात आघाडीवर राहिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुस्लिम बांधवांनी पार्किंगची व्यवस्था सांभाळली आहे. यासाठी त्यांनी पार्किंग कमिटी नेमली आहे. त्यात सलीम कुरणे, सलीम अत्तार, इरफान मुजावर, वाहिद मुजावर, जहाँगीर मेस्त्री, हम्जेखान सिंदी, उस्तम सैय्यद, शकील नगारजी, इर्शाद टिनमेकर, कादर मलबारी, गणी आजरेकर यांचा समावेश आहे. सुमारे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते जागेचे सपाटीकरण, कच्चे रस्ते, मार्किंग करण्यापासून झटत होते. प्रत्यक्ष आज, शनिवारीही ही व्यवस्था मुस्लिम कार्यकर्तेच सांभाळणार आहेत.