गटनेते पदाला काय महत्त्व? एकनाथ शिंदे आणि शिवसेनेत नवा पेच निर्माण होणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:27 PM 2022-06-21T18:27:13+5:30 2022-06-21T18:30:54+5:30
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मंत्री एकनाथ शिंदे यांनी नॉट रिचेबल होत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर शिंदे यांच्यासह पक्षाचे काही आमदार गुजरातला गेल्याचं पुढे आले.
एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना नेतृत्वानेही आक्रमक पवित्रा घेतला. त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले गटनेतेपद काढून घेण्यात आले. त्याऐवजी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली.
एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांनीही त्यावर आक्षेप घेतल्याचं कळतं. नेमकं विधिमंडळ गटनेतेपदाचं काय महत्त्व आहे? गटनेतेपदावरून काढण्याची काय प्रक्रिया आहे हे जाणून घेऊया.
लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर, विविध पक्षांचे खासदार किंवा आमदार निवडून येतात. अशावेळेस पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांची किंवा आमदारांची भूमिका ही एकच असावी, त्यामुळे निवडून आलेले सदस्य हे एकमताने आपला नेता निवडतात व त्याला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देतात.
गटनेत्याने घेतलेले सर्व निर्णय हे पक्षाचे किंवा पक्ष हिताचे असल्याने, एखादा सदस्य विरोधात गेल्यास, गटनेता, त्या सदस्याच्या निलंबनाची शिफारस अध्यक्ष यांना करून त्या सदस्यास पक्षातून निलंबीत करण्यात येते. यामुळे गटनेत्याला अनन्य साधारण महत्व आहे.
मात्र नियमानुसार गटनेत्याची हकालपट्टी अशाप्रकारे करता येत नाही. त्यासाठी आमदारांचे संख्याबळ लागतं. जिथं आमदारांची संख्या नाही तिथे हकालपट्टी करता येत नाही. कायद्यात याला मान्यता नाही. बहुसंख्य आमदारांच्या मान्यतेनेच गटनेत्याची हकालपट्टी करता येते असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दुसरीकडे वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेचे ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित असल्याचं सांगण्यात आले. परंतु तरीही अजय चौधरी यांना गटनेते बनवून त्यांचे पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नाना झिरवळ यांच्याकडे देण्यात आले. त्यावर शिंदे समर्थक आमदारांनी त्यावर आक्षेप घेतला.
शिंदे समर्थकांच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठबळ आहे. त्यामुळे गटनेतेपदी मीच राहणार अशी भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे असं समजतं. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात गटनेतेपदावरून नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हेदेखील तिथे पोहचले. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नकोच अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.
शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे. तत्पूर्वी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करून नवे गटनेते नेमले. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री रात्रीपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.