जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी पोलीस मातोश्रीवर पोहचले; 'त्या' दिवशी काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 03:30 PM 2022-10-06T15:30:51+5:30 2022-10-06T15:35:57+5:30
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावरून उद्धव ठाकरेंवर चौफेर हल्ला चढवला. एकीकडे त्यांनी आपल्या व्यासपीठावर ठाकरे घराण्यातील सदस्यांना बोलावलं दुसरीकडे, शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांना ज्यांनी अटक केली त्यांच्यासोबत सत्तेत बसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर केला जातो. नेमका हा किस्सा काय आहे ते जाणून घेऊया.
१९६० दशकाच्या अखेरीस छगन भुजबळ मुंबईतील भायखळा मंडईत भाजी विकायचे. यावेळी बाळासाहेबाचं भाषण ऐकून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी शिवसैनिक होण्याचा निर्णय घेतला. हा शिवसेनेचा सुरुवातीचा टप्पा होता. त्यावेळी बाळासाहेब पक्ष संघटना मजबूत करत होते. त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा नवीन असला तरी शिवसेनेचे संघटन निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते. तेव्हापासून छगन भुजबळ हे कट्टर शिवसैनिक बनले आणि काही वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर ते पक्षाचे शक्तिशाली नेतेही झाले.
आतापर्यंत छगन भुजबळ यांची गणना बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांमध्ये केली जात होती. ओबीसी समाजात चांगली पकड असलेले भुजबळ हे दबंग आणि बुद्धिवान नेते होते. वक्तृत्व कलेतही ते निपुण होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेचा विस्तारही खूप झाला होता, पण १९८५ मध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. खरे तर त्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना महाराष्ट्रात सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून पुढे आला होता. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना बाळासाहेब आपल्यावर ही जबाबदारी देतील, असे भुजबळांना वाटले. पण तसे झाले नाही. भुजबळांच्या जागी ही जबाबदारी मनोहर जोशींवर सोपवण्यात आली.
बाळासाहेबांनी छगन भुजबळ यांना विरोधी पक्षनेते बनवले नाही, तर त्यांना महापालिकेच्या राजकारणात म्हणजेच BMCमध्ये पाठवले. त्यांना मुंबई शहराचे महापौर केले. त्यानंतर भुजबळ मुंबईत शिवसेनेचे पहिले महापौर झाले. बाळासाहेबांनी त्यांचं डिमोशन केल्याची खंत भुजबळांच्या मनात होती. त्यांना राज्याच्या राजकारणातून आणि शहराच्या राजकारणात ढकलले गेले होते.
१९९१ च्या सुमारास छगन भुजबळ यांनी मौन सोडत मनोहर जोशी यांच्यावर जाहीर हल्ला चढवला. मुंबईचे पुन्हा महापौर होण्यात आपल्याला स्वारस्य नसून आता विरोधी पक्षनेते करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भुजबळांची बंडखोर वृत्ती लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आणि मनोहर जोशींना मातोश्रीवर बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा झाला पण भुजबळ फार काळ शांत राहिले नाहीत.
छगन भुजबळांच्या आतील रागाने बंडाचे रूप धारण केले होते. ५ डिसेंबर १९९१ रोजी भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यानंतर भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या १८ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र सादर करून शिवसेना-ब असा वेगळा गट स्थापन करण्याचा दावा केला. मूळ शिवसेनेपासून वेगळे होत असल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी भुजबळांच्या गटाला मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशाप्रकारे छगन भुजबळ यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. हा तो काळ होता जेव्हा पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुणीतरी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध बंड करण्याचे धाडस केले.
भुजबळांच्या बंडानंतर विधानसभेतील शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ ५२ वरून ३४ वर आले होते. दरम्यान, भाजपानेही संधीचा फायदा घेत विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा केला आहे. भाजपाकडे शिवसेनेपेक्षा जास्त म्हणजेच ४१ आमदार होते. त्यानंतर भाजपच्या या मागणीपुढे शिवसेनेला झुकावे लागले आणि भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले.
छगन भुजबळ आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात शत्रूत्व वाढत गेले. बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळांना धडा शिकवायचा होता आणि राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यावर ही संधी मिळाली. त्या काळात छगन भुजबळ काँग्रेसकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांना शिवसेना-भाजपाच्या मंत्र्यांच्या शेजारी सरकारी बंगला देण्यात आला होता. त्यादरम्यान शेकडो शिवसैनिक कामगार मंत्री साबीर शेख यांच्या बंगल्यावर जमले आणि त्यानंतर अचानक भुजबळांच्या बंगल्यावर हल्ला केला. शिवसैनिक भुजबळांना मारहाण करण्यासाठी शोधत होते पण त्यानंतर भुजबळांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. संतप्त शिवसैनिकांनी बंगल्याची तोडफोड करून फर्निचर व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पोलिसांनी शिवसैनिकांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांनाही पूर्ण यश आले नाही. मात्र, या हल्ल्यात भुजबळ थोडक्यात बचावले.
भुजबळही सूडाच्या भावनेत जळत होते, २००० साली त्यांनाही बदला घेण्याची ती संधी मिळाली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना छगन भुजबळ यांना गृहमंत्री करण्यात आले. ठाकरे यांचा बदला घेण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्यावर हल्ला झालेला जुलै महिना निवडला. १९९२-९३ च्या मुंबई दंगलीत सामना वृत्तपत्रात प्रक्षोभक संपादकीय लिहिल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब ठाकरेंवर करण्यात आला होता. अडचण अशी होती की, ज्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्या कलमांमध्ये अटकेसाठी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्यात आले. मात्र, गृहमंत्री झाल्यानंतर भुजबळांनी पुन्हा फाइल ओपन करत बाळासाहेबांना अटक करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले.
बाळासाहेबांच्या अटकेसाठी २५ जुलै २००० ही तारीख निश्चित करण्यात आली, तो मोठा आणि कठीण निर्णय होता. ठाकरे यांच्या अटकेच्या वृत्ताने महाराष्ट्रभर शिवसैनिकांच्या हिंसक प्रतिक्रिया उमटल्या असत्या आणि परिस्थिती अनियंत्रित होऊ शकली असती. हे सर्व जाणूनही भुजबळ आपल्या निर्णयावर ठाम होते. ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवायचा होता. त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन.सिंग यांना कठोर राहण्याचे आदेश दिले आणि मुंबई शहरात बाहेरून अतिरिक्त फौजफाटा मागवला. २५ जुलै रोजी सकाळपासून मुंबई शहरात तणावाचे वातावरण होते. तोडफोडीच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली. सुमारे पाचशे पोलिसांचा ताफा मातोश्री बंगल्यावर पोहोचला आणि तेथून ठाकरे यांना आधी दादरच्या महापौर निवासस्थानी घेऊन गेले. तेथे ठाकरे यांना रीतसर अटक करण्यात आली आणि नंतर पोलिसांचे पथक त्यांना भोईवाडा न्यायालयात घेऊन गेले. न्यायालयाचे संकुलही पूर्णपणे छावणीत रूपांतरित झाले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तासह न्यायालयाबाहेर शिवसैनिकांचा मोठा ताफा होता.
या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू झाली. पोलिसांनी बाळासाहेबांना अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. बाळासाहेबांवरील आरोपांची चौकशी करून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर ठाकरे यांच्या वकिलांनीही जामीन अर्ज दाखल केला. मात्र, जामीन देण्याऐवजी न्यायाधिशांनी ठाकरे यांच्यावरील खटला कायमचा बंद केला. ते म्हणाले की, गुन्ह्याच्या तपासाची मुदत संपली आहे. न्यायालयाचे कामकाज आटोपल्यानंतर बाळासाहेब कोर्टातून बाहेर आले तेव्हा त्यांनी विजय निशाणी दाखवून शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.