Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 02:09 AM2024-10-20T02:09:41+5:302024-10-20T02:15:17+5:30

Who is IPS Bhagyashree Navtake: भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याच्या तपास अधिकारी असलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधातच सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेतील घोटाळ्याचा तपास करताना जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालो होता. हे प्रकरण आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

१२०० कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात आयपीएस भाग्यश्री नवटके अडकल्या आहेत. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि प्रभावी राजकारणी यांनी सूडातून ही कारवाई केली असल्याचा दावा नवटके यांनी केलेला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केलेली आहे.

आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याविरोधात २७ ऑगस्ट रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा तात्काळ सीबीआयला हस्तांतरित करण्यात आला, पण तांत्रिक कारणांमुळे सीबीआयकडे हस्तांतरित होऊ शकला नव्हता.

आयपीएस भाग्यश्री नवटके या २०१५ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या नवटकेंना महाराष्ट्र केडर मिळालं होतं.

आयपीएस भाग्यश्री नवटके यांचे बी.टेक पर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी केली आणि उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या.

यूपीएससी परीक्षेत त्यांना १२५ वी रँक मिळाली होती. 36 वर्षीय भाग्यश्री नवटके या सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक आहेत.

२०२० ते २०२२ या काळात त्या पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. याच काळात त्यांनी टीईटी भरती परीक्षेतील रॅकेट, क्रिप्टोकरन्सी घोटाळा उघडकीस आणला होता.