एअर इंडियातील नोकरी सोडली अन् बनल्या IPS अधिकारी; कोण आहेत रुपाली अंबुरे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:44 IST2025-01-08T16:23:58+5:302025-01-08T16:44:09+5:30

राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर सध्या 'सडक सुरक्षा, जीवन रक्षा' अभियानाचा मंत्र लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी असलेल्या आयपीएस अधिकारी रुपाली अंबुरे चर्चेत आहेत. रस्ते सुरक्षा नियमांचे लोकांनी पालन करावे आणि स्वत:सोबतच इतरांचे जीवन सुरक्षित ठेवावं असं आवाहन त्यांनी केले आहे.
राज्याच्या परिवहन खात्यात महामार्ग सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या रुपाली अंबुरे यांचा अधिकारी बनण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. कधीकाळी एअर इंडियात केबिन क्रू म्हणून त्या काम करत होत्या. एअर इंडियातील नोकरीनंतर त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.
मुंबईत जन्मलेल्या रुपाली अंबुरे यांचं शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. २००१ च्या सुमारास त्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायची इच्छा होती परंतु मंदीमुळे त्यांचा हा प्लॅन अयशस्वी झाला. त्याच काळात किरण बेदी यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. अंबुरे यांनी पोलीस सेवेत काम करण्याचं ठरवलं.
२००५ साली एमपीएससीची परीक्षा पास करून त्या पोलीस सेवेत भरती झाल्या. त्यानंतर रुपाली अंबुरे यांनी मागे वळून पाहिले नाही. जवळपास २० वर्ष पोलीस सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या रुपाली अंबुरे यांची गणना अशा महिला अधिकाऱ्यांमध्येही होते ज्या सर्वाधिक फिट आहेत.
रुपाली अंबुरे यांनी पोलीस खात्यात विविध पुरस्कार पटकावले आहेत. त्या ठाण्यात डीसीपी म्हणून कार्यरत होत्या. २०२१ साली पहिल्यांदा त्या प्रकाशझोतात आल्या जेव्हा नवी मुंबईत डीसीपी असताना त्यांनी जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ टाकला आणि तो व्हायरल झाला होता.
रुपाली अंबुरे यांनी नवी मुंबई डीसीपीपदावर रुजू होण्यापूर्वी मध्य रेल्वेतही जबाबदारी सांभाळली आहे. रुपाली अंबुरे या एअर हॉस्टेसही होत्या. पोलीस सेवेत आल्यानंतर त्यांनी स्वत:ची प्रतिमा फिट पोलीस अधिकारी म्हणून बनवली. त्यांना डीजी पुरस्कारही मिळाला आहे. खाकी परिधान करण्याचा गर्व असल्याचं त्यांनी इन्स्टा बायोमध्ये लिहिलं आहे.
रुपाली अंबुरे यांनी आतापर्यंत मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक, जळगाव, अमरावतीसह अनेक जिल्ह्यात काम केले आहे. सध्या त्या ठाण्यात महामार्ग वाहतूक विभागात डीसीपी म्हणून काम करत आहेत. पोलीस सेवेत पहिल्यांदा अमरावती इथं रुपाली अंबुरे यांचे पोस्टिंग झाले होते. रुपाली यांनी मुंबई विद्यापीठातून बीईची पदवी घेतली आहे.
रुपाली अंबुरे म्हणतात की, लहानपणापासून काहीतरी वेगळं करायचे असं वाटत होते. पोलीस खात्यात काम करताना समाजाच्या वेगवेगळ्या घटकांशी संपर्क येतो. त्यामुळे पोलीस खात्यात आले. किरण बेदी यांचे आय डेअर हे पुस्तक वाचून मला प्रेरणा मिळाली. त्या काळात सोशल मीडिया फारसा नव्हता. जास्तीत जास्त पुस्तके वाचत होते. आय डेअर पुस्तकाचा माझ्यावर प्रभाव झाला. एक महिला अधिकारी पोलीस खात्यात इतका बदल करू शकते तसं आपल्यालाही काहीतरी करायला हवं असं वाटलं होते.
इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण केल्यानंतर रुपाली अंबुरे यांनी स्पर्धा परीक्षा देणे सुरू केले. त्यातूनच एअर इंडियाच्या कॅबिन क्रूसाठी त्यांचं सिलेक्शन झाले. दीड ते दोन वर्ष एअर इंडियात नोकरी केली. त्यात एमपीएससी परीक्षेतून माझे डीवायएसपी म्हणून निवड झाली. मग एअर इंडियाची नोकरी सोडून रुपाली अंबुरे पोलीस खात्यात आल्या.
रुपाली अंबुरे यांची पोलीस खात्यात निवड झाल्यानंतर त्यांच्या घरी सगळेच आनंदात होते. आजपर्यंत अंबुरे कुटुंबातील कुणी पोलीस नव्हते. रुपाली अंबुरे यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच कुटुंबातील व्यक्ती पोलीस झाले. आजही कुटुंबाच्या पाठिंब्यावर नोकरी, छंद जोपासण्याचं काम रुपाली अंबुरे करतात.