कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 02:55 PM 2024-10-05T14:55:52+5:30 2024-10-05T15:19:39+5:30
अलीकडेच मूळ भारतीय असलेल्या महिला प्रोफेसर यांना प्रतिष्ठित MacArthur Fellowship मिळाली आहे. ज्यानंतर त्या चर्चेत आल्यात. मॅकआर्थर फेलोशिपला जीनियस ग्रँटही म्हटलं जातं. या फेलोशिपमधून महिला प्रोफेसरला ८ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ६ कोटी ७२ लाख रुपये मिळणार आहेत.
या महिला प्रोफेसरचं नाव शैलजा पाईक असं आहे. त्या जीनियस ग्रँट मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या दलित महिला बनल्या आहेत. शैलजा सिनसिनाटी यूनिवर्सिटीत प्रोफेसर आहेत. त्यांनी आजपर्यंत दलित महिलांच्या जीवनशैलीवर अनेक रिसर्च केले आहेत त्याशिवाय बरीच पुस्तकेही लिहिली आहेत.
शैलजा पाईक या मूळ महाराष्ट्रातील अहमदनगरच्या आहेत. त्यांचा जन्म दलित कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब पोहेगावात राहत होते परंतु कालांतराने ते पुण्यात आले. एका झोपडपट्टीतील छोट्या खोलीतून त्यांनी शिक्षणाची कास धरली. भलेही गरीब कुटुंबातले असले तरी आई वडिलांनी नेहमी मुलींच्या शिक्षणावर भर दिला.
शैलजा पाईक यांनी १९९४ साली पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर १९९६ साली MA पदवीही मिळवली. २००७ साली यूकेच्या वॉरविक विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. विद्यापीठाच्या फेलोशिपवर त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथे कॉलेजमध्ये शिकवणं सुरू केले. २००८ ते २०१० या काळात युनियन कॉलेजमध्ये इतिहासाचे व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.
शैलजा यांनी २०१४ मध्ये ‘Dalit Women's Education in Modern India: Double Discrimination’ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात दलित महिलांना शिक्षण घेताना येणाऱ्या आव्हानांबद्दल लिहिले आहे. यानंतर २०२२ मध्ये, त्यांनी 'द वल्गारिटी ऑफ कास्ट: दलित, लैंगिकता आणि आधुनिक भारतातील मानवता' नावाचे दुसरे पुस्तक लिहिले.
शैलजा पाईक यांच्या फेलोशिपची घोषणा करताना मॅकआर्थर फाऊंडेशनने सांगितले की, दलित महिलांच्या आयुष्याशी निगडीत समस्यांवर लक्ष केंद्रित करून पाईक यांनी जातिभेदाचे स्वरूप आणि अस्पृश्यता कायम ठेवणाऱ्या आव्हानांवर भाष्य केले आहे. जातीय वर्चस्वाचा इतिहास आणि दलित महिलांची प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्व नाकारण्यासाठी असमानतेचा वापर कोणत्या मार्गांनी केला जातो याचा शोध घेतला आहे.
मॅकआर्थर फेलोशिप्स सामान्यतः जीनियस ग्रँट्स म्हणून ओळखल्या जातात. ही फेलोशिप शिक्षण, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा यासारख्या विविध क्षेत्रातील लोकांना दिली जाते जे फाउंडेशनच्या मते, असामान्य प्रतिभावान आणि मेहनती व्यक्ती आहेत जे त्यांची क्षमता सिद्ध करून दाखवतात.
एका वृत्तानुसार, या फेलोशिपसाठी निवड अज्ञातपणे प्राप्त झालेल्या शिफारसींवर आधारित आहे. याचं अनुदान अर्ज आणि लॉबिंगशिवाय दिले जाते, जे लाभार्थ्यांना कोणत्याही अटीशिवाय पाच वर्षांसाठी दिले जाते. मॅकआर्थर फेलोशिप १९८१ पासून ११५३ व्यक्तींना देण्यात आली आहे.
या फेलोशिपच्या भूतकाळातील काही उल्लेखनीय लाभार्थी नावांमध्ये लेखक रुथ प्रॉवर झाबवाला आणि वेद मेहता, कवी ए के रामानुजन आणि अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी आणि सेंधील मुल्लैनाथन यांचा समावेश आहे.