राज-उद्धव एकत्र येण्याला पूर्णविराम; ठाकरे कुटुंबातील 'इनसाईड स्टोरी', काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 10:20 AM2022-07-29T10:20:10+5:302022-07-29T10:22:53+5:30

शिवसेनेतील आमदारांच्या नाराजीमागे संजय राऊत नव्हे तर उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलं. यावेळी राज यांनी कुटुंबातील सदस्य कारणीभूत असल्याचे संकेतही दिले.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याला नेमका कुणाचा विरोध आहे हे कुणीही स्पष्टपणे बोलत नसले तरी अनेकांचा रोख उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे आहे. २०१४ मध्येही शिवसेना-मनसे युतीची बोलणी झाली मात्र कुटुंबातील एका सदस्यामुळे ती फिस्कटली असं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी इंडिया टूडेला सांगितले.

२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हापासून चारवेळा शिवसेना-मनसे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या. परंतु प्रत्येकवेळी यश आले नाही. युतीबाबत टाळी वृत्तपत्रातून देता येत नाही असं राज यांनी जाहीर सभेत म्हटलं होते. त्यानंतरही उद्धव-राज भेट झाली नव्हती.

रश्मी ठाकरे शिवसेनेतील निर्णयकर्त्या आहेत हे गुपित राहिलं नाही. त्यांच्या परवानगीशिवाय उद्धव-राज एकत्र येऊ शकत नाही असं कार्यकर्त्यांना वाटतं. मात्र राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यातील संबंध फारसे चांगले नाहीत.

राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आजारपणात त्यांना तेलकट बटाटे वडे खायला दिले जात होते. त्यांनी मला फोन करून चिकन सूप मागितले मी ते पाठवले असं जाहीर सभेत सांगितले होते. यातून बाळासाहेबांची उतारवयात योग्य काळजी घेतली जात नव्हती हे सूतोवाच राज यांनी दिले होते.

नोव्हेंबर २०१९ मध्ये राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात संबंध वाढले होते. राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून शपथविधी सोहळ्याला राज यांनी हजेरी लावली. मात्र त्यानंतर दोघे कधीही राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले नाहीत. आता फोन कॉल्स आणि कुटुंबीयांमधील संवादही थांबल्याचं पुढे आले आहे.

२०२० मध्ये राज यांच्या आई कुंदाताई यांची अँजिओप्लास्टी झाली. परंतु उद्धव ठाकरेंकडून त्यांची चौकशी करणारा फोनही गेला नाही. कुंदाताई आणि उद्धव यांच्या आई मीनाताई या बहिणी आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये उद्धव यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हा राज यांना भेटण्याची आणि फोनवर बोलण्याची परवानगी नव्हती.

मागील महिन्यात राज ठाकरेंवर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया झाली. तेव्हाही उद्धव ठाकरेंनी राज यांची विचारपूस केली नाही. याउलट राज ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर गेले.

आता उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातील सर्वात कठीण राजकीय लढाई आहे. शिवसेनेतील फूट टाळण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तेव्हा कुटुंबात उद्धव ठाकरे एकाकी पडले आहेत. आई-वडील, भाऊ बिंदुमाधव हे हयात नाहीत. तर दुसरा मोठा भाऊ जयदेवसोबत त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. बाळासाहेबांच्या संपत्तीवरून दोघेही भाऊ न्यायालयीन लढाई लढत आहेत.

राज यांच्या बहीण जयवंती आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी जवळच्या मैत्रिणी आहेत. परंतु त्यांच्यासोबतही उद्धव यांचे सौहार्दपूण संबंध नाहीत. त्यात राज ठाकरेंनी ताज्या मुलाखतीत मी उद्धवला चांगले ओळखतो. तो विश्वासार्ह व्यक्ती नाही असं सांगत एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाची मनं दुभंगली, संवाद संपल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे.