शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव का झाला? लोकसभेला तटकरेंना मदत भोवली, लोकांचे मत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 09:38 AM2024-07-13T09:38:09+5:302024-07-13T09:43:26+5:30

Vidhan Parishad Election Result: जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेची किनार जोडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळेच असेही बोलले जात आहे.

विधान परिषदेला तीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी आपला उमेदवार दिला आणि निवडणूक चुरशीची बनविली. यामुळे मविआची मते फुटली आणि शेकापच्या जयंत पाटलांना त्याचा फटका बसला. आजवर दुसऱ्या पक्षांच्या मतांवर निवडून येणाऱ्या पाटलांचा पराभव झाला. हा पराभव झाला की ठरवून केला गेला, असा संशय आता सोशल मीडियावर व्यक्त केला जाऊ लागला आहे.

जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेची किनार जोडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळेच असेही बोलले जात आहे. रायगड भागात जयंत पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे. ही मते पाटील यांनी शिवसेनेला न देता ती आघाडीत असूनही तटकरेंच्या विजयासाठी फिरविल्याची चर्चा या भागात होत होती. हीच चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे. यामुळे जयंत पाटलांना धडा शिकविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठरवून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याची चर्चा होत आहे.

जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. शरद पवारांकडे १२ आमदार आहेत. तर शेकापचा १ अशी १३ मते तरी पाटलांना पडायला हवी होती. परंतू प्रत्यक्षात पहिल्या पसंतीची ८ आणि नंतर एकूण अशी १२ मतेच पाटलांना पडली आहेत. यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे एक मत फुटले की काय असा संशयही व्यक्त होत आहे.

लोकसभेला शिवसेनेला मदत केली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार देत जयंत पाटलांना मदत न करण्याचा निर्णय घेतला असेल, असे मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. शेकापचे जयंत पाटील आज विधानपरिषदेत पडले त्यामागे रायगडचा सुनील तटकरेंचा विजय जबाबदार आहे हे उघड गुपित आहे, असेही काही जणांनी म्हटले आहे.

रायगड मावळमध्ये झालेला मविआचा पराभव ठाकरे पवारांच्या जिव्हारी लागला होता. याचा वचपा ठाकरे पवारांनी काढल्याचे मत युजर्सकडून व्यक्त केले जात आहे. याला विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील हे देखील अपवाद नाहीत.

इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ? असे ट्विट कपिल पाटील यांनी केले आहे.

तर काही जणांनी जयंत पाटलांनी आता विधानसभेला उभे रहावे, बघुयात तटकरे मदत करतात का, असाही सवाल करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी रायगडात सुनिल तटकरेंना मदत केली होती त्याचं रिटर्न गिफ्ट आज तटकरेंनी जयंत पाटलांना दिले, असेही म्हटले आहे.