मोठी बातमी: शरद पवार परळीत नवा डाव टाकणार; धनंजय मुंडेंविरोधात आता वेगळ्याच चेहऱ्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:53 PM2024-09-12T13:53:44+5:302024-09-12T14:03:04+5:30

मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या नव्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर पवारांकडून आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

पक्षफुटीवेळी अजित पवार यांना साथ देणाऱ्या पक्षातील दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुकीत आस्मान दाखवण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असून अनेक मतदारसंघामध्ये पवार यांच्याकडून त्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे.

आंबेगावमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना ताकद दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजीतसिंह घाटगे यांना पक्षात घेत कागलचा उमेदवार निश्चित केला. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी बबन गित्ते यांना परळी विधानसभेसाठी ताकद दिली होती. मात्र एका खून प्रकरणात गित्ते हे तुरुंगात गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. अशातच आता काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेसाहेब देशमुख यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

बबन गित्ते हे खून प्रकरणामुळे अडचणीत आल्याने शरद पवार यांच्याकडून काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुख यांना पक्षात घेऊन परळीतून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी वाद पाहायला मिळाला होता. या ध्रुवीकरणाचा फायदा होऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे बीडचे खासदारही झाले.

या पार्श्वभूमीवर आता राजेसाहेब देशमुख यांच्या रुपाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मराठा चेहरा मैदानात उतरवण्याचा निर्णय शरद पवार यांच्याकडून घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, बीडमधील सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या बबन गित्तेंना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली होती.

बनन गिते हे परळी पंचायत समितीचे माजी सभापती असून परळीतील नेते आहेत. बबन गित्ते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता.

मात्र काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

सरपंच बापू आंधळे हे बबन गित्ते यांचे जुने सहकारी होते. जनक्रांती संघटनेचे संस्थापक बबन गित्ते यांच्या पॅनलमधून मरळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तर बबन गित्ते यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत ७०० गाड्यांचा ताफा नेत बीड मध्ये प्रवेश केला व त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.